न्याय न मिळाल्यास 18 जानेवारीपासून उपोषणाचा इशारा
| मुरुड जंजिरा | वार्ताहर |
तालुका गटविकास अधिकारी व ग्रामसेवक विहूर यांना वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही प्रशासन दाद देत नसल्याने शेजार्यांच्या त्रासवादी वर्तनाने माझ्यावर अन्याय होत असून, अनधिकृत बांधकाम करणे सुरुच आहे. तेव्हा प्रशासनाने न्याय देऊन वाढीव बांधकाम थांबवून न्याय मिळावा, असे थेट साकडे रायगड जिल्हाधिकारी यांना घातले आहे. न्याय न मिळाल्यास नाईलाजास्तव येत्या 18 जानेवारीपासून तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा विहुर बौद्धवाडी येथील विधवा महिला रंजना केशव तांबे यांनी लेखी पत्राद्वारे दिला आहे. रंजना तांबे यांच्या पत्रात मोनिश महेद्र तांबे व महेद्र हरी तांबे हे दोघे घराचे काम अनधिकृतपणे करीत असून माझ्या वहिवाटीच्या जागेवर दोन घरांमधील अंतर न सोडता घराला खेटून बांधकाम सुरुच ठेवल्याची तक्रार केली असून, दमदाटी करून मारहाणीसाठी अंगावर येत असल्याने याबाबत मुरुड पोलीस ठाण्यात तक्रारसुद्धा दाखल केली होती. माझ्या जीविताला धोका निर्माण झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. तरी जिल्हाधिकार्यांनी न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती केली आहे. न्याय न मिळाल्यास 18 जानेवारी रोजी उपोषण करणार असल्याचे रंजना तांबे यांनी लेखी अर्जाद्वारे इशारा दिला आहे.
- तांबे यांचा उपोषणास बसण्याचा अर्ज प्राप्त झाला आहे. गटविकास अधिकारी, ग्रामसेवक व बांधकामाशी संबंधित असणार्या लोकांना बोलावून यावर तोडगा काढून सदरील वाद समन्वयाने मिटवणार आहोत. सदरील महिलेस न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. – गोविंद कौटुंबे, नायब तहसीलदार







