उरण करंजा येथील आठ व्यक्तींवर खंडणीचा गुन्हा दाखल

उरण | वार्ताहर |
करंजा येथे राहणार्‍या अमित ठाकूर व इतर सात व्यक्तींवर उरण पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात फिर्यादी मंगेश गणपत कामथे यांनी आरोपींनी 600 रुपये खंडणी घेतल्याप्रकरणी फिर्याद दिली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सह. पोलीस निरीक्षक कावळे यांनी सदरप्रकरणी गुन्हा दाखल केला. याबाबत शनिवार, दि.8 जानेवारी रोजी उरण पोलीस ठाण्यातून माहिती मिळाली.
या संदर्भात हकीकत अशी की, उरण तालुक्यातील समुद्राच्या बाजूला वसलेल्या करंजा गावात करंजा बंदराचे काम चालू आहे. त्या बंदराच्या कामासाठी लागणारे साहित्य घेऊन अनेक ट्रक व डंपर येत असतात. अशाच दि.21 डिसेंबर रोजी संध्या 5 वाजता व 22 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता कंपनीचा माल घेऊन डंपर आले होते. तेव्हा आरोपी अमित ठाकूर व इतर सात ते आठ लोकांनी डंपर अडवले. त्यानंतर येथील रस्त्याने गाड्या भरून जाणार असतील तर कोंढरे ग्रामस्थ मंडळाची परवानगी पावती फाडावी लागेल असे सांगून एका डंपर चालकाकडून 100 तर दुसर्‍याकडून 500 रुपये अशी एकूण 600 रुपये खंडणी घेतल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
सर्व बाजू तपासल्या नंतर व घटनेची खातरजमा केल्यानंतर आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी उरण पोलीस ठाण्याचे सह. पोलीस निरीक्षक महेश माने अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version