। पनवेल । वार्ताहर ।
बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याने एका पोलीस शिपायावर निलंबनाची कारवाई नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी केली आहे. रुपेश कोळी असे आरोपी पोलीस शिपायाचे नाव आहे. पोलीस शिपाई रुपेश सुरेश कोळी (वय 23) याने पीडित महिलेची इन्सटग्रामवर ओळख वाढवली व त्यांच्याशी मैत्री करून लग्न करणार आहे असे सांगून तिच्यासोबत वारंवार शारिरीक संबंध ठेवले. आणि ती पीडित महिला गरोदर राहिल्यावर गर्भनिरोधक गोळ्या देऊन त्यांचा गर्भपात केला आणि पीडित महिलेसोबत लग्न करण्यास नकार दिला. चार दिवसांपूर्वी खांदेश्वर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई रुपेश यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर गुन्ह्याची प्राथमिक माहिती स्वतः आयुक्तांनी घेऊन त्याबाबत खातरजमा करून ही सक्तीची कार्यवाही केली. रुपेश हे नवी मुंबई पोलीस मुख्यालयातील परिवहन विभागात नेमणुकीस होते. त्यांच्याकडील ओळखपत्र, सरकारी शस्त्रही तातडीने जमा करण्यासह त्यांना दररोज रोडपाली, कलंबोली येथील पोलीस मुख्यालयात हजेरी लावण्याचे आदेश आहेत.