रायगड जिल्ह्यात आढळलेला पहिला प्रौढ पक्षी
। पाली/बेणसे । धम्मशील सावंत ।
रायगड जिल्ह्यातील मुरुड येथील कोर्लई समुद्रकिनारी लाईट हाऊस जवळ दुर्मिळ मोठा समुद्री कावळा (बुबी मास्कड) पक्षाचे दर्शन झाले. रायगड जिल्ह्यात बहुदा पूर्ण वाढ झालेला हा पहिला पक्षी दिसला असण्याची शक्यता पक्षी व वन्यजीव अभ्यासकांनी वर्तवली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अलिबाग येथील वन्यजीव अभ्यासक आणि वन्यजीव रक्षक डॉ. प्रसाद दाभोळकर यांनी सांगितले की त्यांना मुरुड कोर्लई येथून काही ओळखीच्या पर्यटकांनी फोन करून येथे एक वेगळा पक्षी दिसत असून तो आजारी किंवा दमलेला वाटत असल्याचे सांगितले. काही हौशी पर्यटक या पक्षाला उचलून घेत आहेत, तर काही सेल्फी काढत आहेत. त्यांनी या पक्षाचा फोटो डॉ. प्रसाद दाभोळकर यांना पाठवला असता हे फोटो लागलीच पक्षी अभ्यासक शंतनु कुवेसकर यांना पाठवले आणि हा पक्षी दुर्मिळ मोठा समुद्री कावळा (बुबी मास्कड) असल्याची खात्री केली. त्यानंतर त्यांनी ताबडतोब मुरुड येथील वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियांका पाटील यांना याबाबत कळवले. प्रियांका पाटील यांनी वनरक्षक भगवान पिंगळे यांना लगेच जागेवर पाठविले मात्र तो पर्यंत हा पक्षी तेथून निघून गेला होता. डॉ. प्रसाद दाभोळकर यांनी सांगितले की हा दुर्मिळ समुद्री पक्षी आहे. कदाचित रस्ता भरकटुन येथे किनारी आला असावा आणि थकवा निघून गेल्यावर तो तेथून निघून गेला असावा.
मास्कड बुबी म्हणजेच मोठा समुद्रीकावळा या पूर्ण वाढीच्या पक्ष्याची रायगडच्या समुद्री किनाऱ्याहून बहुदा पहिलीच छायाचित्रित नोंद असावी. यापूर्वी काही अप्रैाढ असलेले पक्षी किनाऱ्यांहून बचाव करण्यात आले होते. बुबी हे पक्षी किनाऱ्यापासून खूप दूर उष्णकटिबंधीय महासागरामध्ये राहणे पसंत करतात. फक्त प्रजनन काळातच हे पक्षी जमिनीवर तेही समुद्री बेटे व किनाऱ्याजवळील उंच कड्यांमध्ये घरटी करणे पसंत करतात. भारतातील समुद्रकिनाऱ्यावरील या पक्ष्यांचे दर्शन अतिशय दुर्मिळ आहे.
शंतनु कुवेसकर, वन्यजीव अभ्यासक, माणगाव, रायगड
अशा प्रकारचा पक्षी जर कोणाला दिसून आला तर त्यांनी ताबडतोब वनविभागाला कळवावे. तसेच अशा दुर्मिळ पक्षासोबत सेल्फी काढू नये व त्याला हाताळू देखील नये.
प्रियांका पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी, मुरुड