| विक्रमगड | प्रतिनिधी |
सध्या निसर्गात दुर्मिळ होत चाललेल्या पशु-पक्षी व सापांचे ग्रामीण भागात दर्शन होत आहे. पाली येथील नकुल पाटकर यांच्या दुकानात नागरी वस्तीमध्ये दुर्मिळ ‘कुकरी साप’ आढळून आला. हा साप बिनविषारी असून, त्याची लांबी साधारणतः 30 ते 60 सेंटीमीटर इतकी असते. इतर सापांच्या तुलनेत याचे दात कमी असतात. वरच्या जबड्यातील मागील दात गुरख्यांच्या कुकरीसारखे वळणदार असल्याने या सापाला ‘कुकरी साप’ असे नाव देण्यात आले आहे. हा साप स्वभावाने चपळ, मात्र भित्रा व लाजाळू असतो. सरडे, पाली व त्यांची अंडी हे त्याचे प्रमुख खाद्य आहे. त्याचे शरीर तपकिरी रंगाचे असून त्यावर 20 ते 60 काळे आडवे पट्टे आढळतात. धोका जाणवल्यास हा साप आपले शरीर फुगवतो. ग्रामीण भागात ‘कुकरी साप’ विषारी असल्याचा गैरसमज असल्याने अनेक वेळा या निरुपद्रवी सापाची हत्या केली जाते. या चुकीच्या समजुतीमुळे आकर्षक अशा दिसणाऱ्या कुकरी सपाची संख्या ग्रामीण भागातून दिवसेंदिवस झपाट्याने कमी होत असल्याची खंत सर्पमित्र पप्पु दिघे यांनी व्यक्त केली आहे.







