| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले असून, प्रभाग क्रमांक 8 ‘क’मधून महाविकास आघाडीच्या उमेदवार रश्मी कदम यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. वाणिज्य शाखेच्या पदवीधर असलेल्या रश्मी कदम यांच्या पाठीशी त्यांचे पती आणि खंबीर राजकीय नेतृत्व राजेश कदम यांची मोठी ताकद उभी राहिली असून, या दाम्पत्याने कळंबोलीच्या विकासासाठी कंबर कसली आहे.
रश्मी कदम या वाणिज्य शाखेच्या पदवीधर असल्याने त्यांना आर्थिक नियोजन आणि प्रशासनाची चांगली समज आहे. त्यांना राजेश कदम यांच्या दांडग्या जनसंपर्काची जोड मिळाल्याने प्रभाग 8 ‘क’मध्ये महाविकास आघाडीचे पारडे जड झाले आहे. कळंबोलीतील प्रश्नांची जाण असलेले राजेश कदम गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. त्यांच्या अनुभवाचा आणि रश्मी कदम यांच्या उच्च शिक्षणाचा फायदा प्रभागाच्या विकासासाठी होईल, असा विश्वास मतदारांमध्ये निर्माण झाला आहे. प्रशासकीय कामांचा पाठपुरावा आणि जनतेच्या हक्कासाठी लढा ही आमची परंपरा आहे आणि ती आम्ही यापुढेही जोमाने चालवू, असे आश्वासन राजेश कदम यांनी प्रचारादरम्यान दिले आहे.
प्रचाराच्या केंद्रस्थानी मालमत्ता कराचा विषय असून, वाढीव कराच्या ओझ्यातून कळंबोलीकरांना मुक्त करण्यासाठी रश्मी आणि राजेश कदम आग्रही आहेत.त्याचप्रमाणे, बाळाराम पाटील यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना कळंबोलीत जी भरीव कामे केली, त्याचे श्रेय घेणाऱ्या विरोधकांवर त्यांनी सडकून टीका केली. ज्या कंत्राटदारांनी बाळाराम पाटलांच्या काळात कामे केली, तेच आज विरोधकांच्या तालावर नाचून स्वतःकडे श्रेय घेत आहेत. हा दुटप्पीपणा कळंबोलीकर सहन करणार नाहीत, अशा शब्दांत कदम दाम्पत्याने विरोधकांना लक्ष्य केले. तसेच, कळंबोलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचे स्वप्न रश्मी आणि राजेश कदम यांनी उराशी बाळगले आहे. हे स्मारक केवळ दगड-विटांचे नसून ती कळंबोलीच्या अस्मितेची ओळख असेल, असा शब्द देखील त्यांनी मतदारांना दिला आहे.







