रश्मी शुक्ला यांची पोलिस महासंचालकपदी नियुक्ती

। मुंबई । वृत्तसंस्था ।

महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती झाल्याची माहिती भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. एका पोस्टद्वारे मुनगंटीवार म्हणाले की, ‘महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदी श्रीमती रश्मी शुक्ला यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.!!’ मात्र, याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. शुक्ला यांच्या नियुक्तीमुळे राज्याला पहिल्या महिला पोलिस महासंचालक मिळाल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या फोन टॅपिंग प्रकरणात त्या चर्चेत आल्या होत्या.

रश्मी शुक्ला यांच्या नियुक्तीच्या आदेश अद्याप काढण्यात आलेला नाही. शुक्ला या सध्या सीआरपीएफमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे त्या राज्यात पुन्हा कमबॅक करण्याची शक्यता आहे. याबाबत अधिकृत आदेश आज दिवसभरात काढण्यात येईल अशी शक्यता आहे. कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीच याबाबत माहिती दिली असल्याने जवळपास त्यांचे नाव निश्चित असल्याचं समजते.

सध्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एमपीएससीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिस महासंचालक पदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा जोरात सुरु झाली होती. रश्मी शुक्ला या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतल्या असल्याचं बोललं जातं. फोन टॅपिंग प्रकरणात त्यांची निर्दोष सुटका झाली आहे.

Exit mobile version