रश्मी शुक्लांकडून आचारसंहितेचा भंग

| मुंबई | प्रतिनिधी |

राज्यात नुकताच विधानसभा निवडणुकीचा निकालही जाहीर झाला आहे. या काळात आचारसंहिता लागू असते. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर आयपीएस अधिकारी रश्मी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आचारसंहितेच्या काळात त्यांनी गृहमंत्र्यांची भेट घेत आचारसंहितेचा भंग केला आहे. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेत रश्मी शुक्ला यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
अतुल लोंढे म्हणाले की, तेलंगणामध्ये अशाच प्रकारे पोलीस महासंचालक व एका वरिष्ठ अधिकार्‍याने वरिष्ठ मंत्र्याची भेट घेतली होती. त्यावेळी निवडणूक आयोगाने त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली होती. गैरभाजपाशासित राज्यात निवडणूक आयोग तात्काळ कारवाई करते. पण, भाजपाशासित राज्यात निवडणूक आयोग काहीही कारवाई करताना दिसत नाही. आचरसंहिता भंगांच्या घटनांकडे निवडणूक आयोग डोळेझाक करत आहे. या घटनेची निवडणूक आयोगाने दखल घेत कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच रश्मी शुक्ला यांच्यावर विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग करण्यासारखे गंभीर गुन्हे आहेत, याची आठवणही त्यांनी करून दिली.

रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवावे, अशी मागणी काँग्रेस पक्षाने निवडणुकीच्या काळात केली असता त्यांना पदावरून हटवण्यात आले आहे. विधानसभेचा निकाल लागला असला तरी निवडणूक आचारसंहिता संपण्यापूर्वीच गृहमंत्र्यांना भेटून रश्मी शुक्ला यांनी आदर्श आचार संहितेचे उल्लंघन केले आहे. त्यांच्यावर तातडीने कारावाई झाली पाहिजे, अशी मागणी अतुल लोंढे यांनी केली.

Exit mobile version