धक्कादायक! पावामध्ये आढळल्या उंदराच्या विष्ठा

। नागोठणे । वार्ताहर ।

नागोठणे शहरातील गुरव आळी भागात नूर सबा व शेहजाज खुर्शीद अन्सारी यांच्यामार्फत सुरु असलेल्या किंग बेकरीमध्ये बनविण्यात आलेल्या पावामध्ये चक्क उंदराच्या विष्ठा आढळून आल्या असून, व्यावसायिकाचा गलिच्छपणा उघड झाला आहे. या घटनेने नागोठणे शहरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबतीत अन्न व औषध प्रशासनाच्या पेण विभागाने या बेकरीतील उत्पादन प्रक्रियेवर बंदीची कारवाई केली आहे.

सुधागड तालुका युवा सेना अधिकारी सचिन डोबले यांचा नागोठणे हायवे नाका येथे पेट्रोल पंपाशेजारी नवीन दुचाकी व चारचाकी वाहनांच्या टायर विक्रीचा व्यवसाय आहे. गुरुवार, दि. 4 ऑगस्ट रोजी डोबले यांनी दुपारी जेवणाचा डब्बा न आणल्याने त्यांनी जेवणासाठी त्यांच्या दुकानातील कामगाराला सांगून नागोठणे येथील एका हॉटेलमधून पावभाजी मागवली. ज्यावेळी ही पावभाजी खाण्यास गेले, त्यावेळेस त्यांनी पावात काही तरी काळसर दिसले. त्यांनी नीट पाहिल्यावर त्या काळसर उंदराच्या लेंड्या असल्याचे दिसून आले. त्यांनी लगेचच जेथून ती पावभाजी आणली त्या हॉटेलमध्ये जाऊन यासंदर्भात विचारणा केली. हॉटेल मालकाने पाव घेऊन येणार्‍या फेरीवाल्यास तात्काळ बोलावून घेतले. त्यानंतर हे पाव किंग बेकरीतून आणल्याचे स्पष्ट झाले. ही माहिती मिळताच त्यांनी मित्रांसह नागोठणे पोलीस ठाणे गाठले आणि याविषयी लेखी तक्रार केली. परंतु, संबंधित विषय हा अन्न व औषध प्रशासनाच्या अखत्यारीत येत असल्याने त्यांनी यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाच्या पेण येथील कार्यालयात संपर्क साधून संपूर्ण माहिती दिली.

या घटनेची तात्काळ दखल घेऊन अन्न सुरक्षा अधिकारी स.रा. आढाव, व्ही.एस. निकम व पाटील यांनी सायंकाळी नागोठणे येथे येऊन किंग बेकरीतील उत्पादन केलेल्या पाव व पावाच्या लाद्यांची तसेच बेकरीची संपूर्ण तपासणी करून पाहणी केली. यावेळी अधिकार्‍यांना या बेकरीत उंदरांनी कुरतडलेले पाव, आळी पडलेल्या काही पावाच्या लाद्या दिसल्या. याचबरोबर बेकरीत काही ठिकाणी पडलेल्या उंदराच्या विष्ठांसह सर्वत्र अस्वच्छता दिसून आली. यावेळी किशोर म्हात्रे, ज्ञानेश्‍वर सांळुके यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

दरम्यान, बेकरीची पावांची प्रत्यक्ष पाहणी करून अधिकार्‍यांनी बेकरी मालकास उत्पादन बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भातील पत्र नागोठणे पोलिसांना संबंधित अधिकार्‍यांकडून देण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेनंतर बेकरी व्यावसायिकांचा गलिच्छपणा पुन्हा एकदा सर्वांसमोर आला आहे. त्यामुळे अशा बेकरी व्यावसायिकांवर योग्य दंडात्मक कारवाई करण्यात, यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Exit mobile version