। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
शहरातील साळवी स्टॉप येथे साचून राहिलेल्या गेल्या अनेक वर्षांपूर्वीच्या कचर्याची विल्हेवाट पालिकेने लावली नाही. याची गंभीर दखल प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून घेण्यात आली असून, पालिकेवर कडक कारवाई करण्याचा अंतिम प्रस्ताव कोल्हापूर कार्यालयाला पाठविण्याच्या हालचाली चालू आहेत. आगामी काळात या कचरा डेपोची पाहणी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून केली जाणार आहे.
शहरातून गोळा केला कचरा साळवी स्टॉप येथील पाण्याच्या टाकीजवळील कचरा डेपोमध्ये टाकला जात होता. त्या कचर्याची विल्हेवाट लावण्याचे मोठे आव्हान नगर पालिकेपुढे आजही आहे. साचलेल्या या कचर्यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या परिसरात कचर्याची दुर्गंधी आणि अधूनमधून कचर्याला लागणार्या आगीमुळे धुराचे साम्राज्य निर्माण होत होते. याला पर्याय म्हणून पालिकेकडून घनकचरा प्रकल्पही राबविला जात आहे. जुन्या कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने रत्नागिरी पालिकेला यापूर्वी नोटिसाही बजावलेल्या होत्या. पालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. परंतु कचरा मोठ्याप्रमाणात असल्याने त्याचे विघटन करणे अशक्य झाले आहे.
दिवसेंदिवस हा प्रश्न गहन होत चालला आहे. प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेकडून कडक पावले उचलावीत यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दंडात्मक कारवाईही केली होती. तरीही जुन्या कचर्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडवण्यात आलेला नाही. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कडक पावले उचलण्यात येणार आहेत. येत्या काही दिवसांमध्ये कचरा डेपोची पाहणी करून कारवाईचा प्रस्ताव कोल्हापूरच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून घनकचरा प्रकल्प उभारण्यासाठी पालिकेकडून पर्यायी जागा शोधत आहे. दांडेआडोम येथे हा घनकचरा प्रकल्प उभारण्याची तयारीही केली होती. स्थानिकांच्या विरोधामुळे त्यावर कार्यवाही झाली नाही. त्यामुळे पालिका भविष्यात कोणता निर्णय घेणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
साळवी स्टॉप येथील जुन्या कचर्याच्या विल्हेवाटीसाठीही पावले उचलली आहेत. त्यातील काही कचर्यापासून खत निर्माण करण्यासाठी प्रयोग केला गेला; परंतु उर्वरित कचरा विल्हेवाट लावण्यासाठी सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. – निमेश नायर, आरोग्य सभापती, रत्नागिरी नगरपालिका