| चिरनेर | प्रतिनिधी |
स्वर्गीय रत्नाकर गाताडी हे कोप्रोली गावचे खरे रत्न होते. त्यांनी निवेदन कलेच्या माध्यमातून कोप्रोली गावाचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविले आहे, असे गौरवोद्गार शिक्षिका रणिता ठाकूर यांनी काढले. निवेदक तथा आदर्श शिक्षक स्वर्गीय रत्नाकर गाताडी यांचा 12वा पुण्यस्मरण दिन गुरुवारी (दि.1) सुयश क्लासेस आवरे यांच्यावतीने कडापे येथील प्राथमिक शाळेत साजरा करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.
रत्नाकर गाताडी हे व्यक्तिमत्व केवळ शब्दांचे जादूगार नव्हते, तर विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारे प्रेरणास्थान होते. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालावा, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व वक्तृत्वगुण विकसित व्हावेत, या उद्देशाने स्वच्छता अभियाना अंतर्गत वकृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या वकृत्व स्पर्धेत कडापे शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपले वकृत्व सादर केले. त्यात प्राप्ती म्हात्रे व आरोही थळी यांनी सादर केलेल्या वकृत्वाने उपस्थितांची मने जिंकली. यावेळी श्रेयस क्लासेस तर्फे शैक्षणिक साहित्याचे व दिनदर्शिकांचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक सर्वेश ठाकूर, प्रणिता ठाकूर, नागेंद्र म्हात्रे, शंकर पाटील, हरीश म्हात्रे, साक्षी थळी, पल्लवी थळी, नीलम थळी, अविष्कार म्हात्रे, सुप्रिया थळी आदी उपस्थित होते.







