रविशेठ पाटील गेला खड्ड्यात; आ. महेंद्र दळवी यांचा संताप

ठेकेदाराच्या इंजिनिअरला शिवसैनिकांची मारहाण
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
खारबंदिस्तीच्या कामात दोन कोटींचा हप्ता मागण्याचा आरोप पेणचे आमदार रवींद्र पाटील यांनी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्यावर केल्यानंतर महेंद्र दळवी यांनी संताप व्यक्त करीत ठेकेदाराच्या इंजिनिअरसमोर ‘रविशेठ पाटील गेला खड्ड्यात, आम्ही तुम्हाला समज देतो’, असे उद्गार काढीत ‘मी कोणाला भीत नाही, आम्हाला काम द्या, स्थानिक लोकांसोबत अ‍ॅडजेस्टमेंट केले नाहीत तर लोक कामे कशी करुन देतील?’ असे आव्हान रवींद्र पाटील यांना दिले आहे. पुन्हा असा प्रकार घडला, तर काम बंद पाडू, अशी धमकीदेखील महेंद्र दळवी यांनी ठेकेदाराला दिली आहे.
खारबंदिस्तीच्या कामात महेंद्र दळवी कंत्राटदाराकडून दोन कोटी रुपयांची मागणी करत असल्याचा आरोप पेणचे आमदार रवींद्र पाटील यांनी केल्याचे वृत्त ‘कृषीवल’ने प्रसिद्ध करताच बिंग फुटल्याने संतप्त पेणच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ठेकेदाराचे अभियंता सुनील पाटील यांना पेण कार्यालयात दमदाटी आणि मारहाण करीत गाडीत घालून महेंद्र दळवी यांच्यासमोर हजर केले. त्यांच्यावर प्रश्‍नांचा भडिमार करीत रवींद्र पाटील खंडणीबाबत बोलत असताना तुम्ही त्यांना का अडविले नाही, असा जाब विचारला. महेंद्र दळवी यांच्यासमोर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ‘आम्ही याला ठोकून बांधावर आडवा टाकणार होतो’ असेही विधान केेले. मुळात, हा आरोप पाटील यांनी केला असता, त्यांना जाब विचारण्याऐवजी ठेकेदाराला वेठीस धरण्याचा प्रकार पाहून संताप व्यक्त केला जात आहे. घाबरवून दहशतवाद पसरविण्याच्या या प्रकारामुळे अलिबाग, पेणमध्ये दहशतवाद निर्माण करण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. या प्रकारामुळे ठेकेदार आणि त्याचे इंजिनिअर घाबरुन गेले आहेत. त्यांच्या जीवाचे काही बरे-वाईट झाले तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल केला जात आहे.

Exit mobile version