| पनवेल | वार्ताहर |
खालापूर तहसील कार्यालयात पुरवठा शाखेत झालेल्या रॉकेल भ्रष्टाचारा विरोधात नवीन पोसरी येथे राहणारे रवींद्र नारायण देसाई यांनी माहितीच्या अधिकाराखाली पुरवठा शाखेतील रॉकेलच्या भ्रष्टाचाराबाबत माहिती मागविली होती. परंतु ती माहिती दिली गेली नसल्याने त्यांनी अपिलात जावून जिल्हा पुरवठा अधिकार्यांकडे अपिल दाखल केले होते. तेथेही त्यांना अपुरी माहिती देवून तोंडाला पाने पुसली गेली. त्या विरोधात त्यांनी 10 एप्रिल रोजी कोकण आयुक्त कार्यालयावर आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे.
माहितीच्या अधिकाराखाली अत्यंत खरी माहिती देणे हा कायदा असताना भ्रष्टाचार लपवून ठेवण्यासाठी त्याला गालबोट लावून तहसीलदार खालापूर यांनी अपूर्ण माहिती दिल्यामुळे देसाई यांनी 20 एप्रिल 2022 रोजी माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीमध्ये तफावत दिसत असल्यामुळे अपिल दाखल केले होते. त्या अपिलावर जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी तहसीलदार खालापूर यांना मागितलेली माहिती पूर्ण देण्याचा हुकूम बजावला व त्याची प्रत उपविभागीय अधिकारी कर्जत यांना पाठविण्यात आली. उपविभागीय अधिकारी कर्जत यांनी याबाबत तातडीने कारवाई करून संबंधितांना सत्य परिस्थिती देण्याबाबत आदेश दिले. त्याकडेही तहसीलदार खालापूर यांनी दुर्लक्ष केल्यामुळे रवींद्र देसाई यांनी कोकण आयुक्त कार्यालयावर 10 एप्रिल 2023 रोजी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.