| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यात खासदार धैर्यशील पाटील आणि आमदार रवीशेठ पाटील हे जरी एकत्र आले असले, तरी अंतर्गत गटबाजी अद्याप संपलेली नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. आमदार रवीशेठ पाटील यांच्या समर्थकांनी थेट खासदार गटाविरोधात बंडाचे निशाण हाती घेतल्याने पेणमधील राजकीय वातावरण तापले आहे.
23 वडखळ गणासाठी उमेदवारीवरून सुरू झालेल्या वादातून हे बंड उफाळून आले आहे. या गणासाठी भाजपचे उपजिल्हाध्यक्ष मिलिंद पाटील आणि प्रभाकर म्हात्रे ऊर्फ हरी ओम हे दोघेही इच्छुक होते. मागील निवडणुकीत जिल्हा परिषदेचे सदस्य असलेले प्रभाकर म्हात्रे हे खासदार गटाचे, तर जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाटील हे आमदार गटाचे मानले जात होते. मात्र, उमेदवारी प्रभाकर म्हात्रे यांना मिळाल्याने नाराज झालेल्या मिलिंद पाटील यांनी आपल्या पक्ष पदाचा तसेच भाजपचा राजीनामा देत शिवसेना (शिंदे गट) कडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयाला आमदार रवीशेठ पाटील यांचे खंदे समर्थक व्ही.बी. पाटील, गोरख पाटील, राजेश मोकल यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे हे बंड केवळ वैयक्तिक नाराजीपुरते मर्यादित न राहता संघटित स्वरूप धारण करत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, पेणमध्ये दबक्या आवाजात अशी चर्चा सुरू आहे की, खासदार धैर्यशील पाटील यांच्या विरोधातच आमदार गटातील समर्थक मिलिंद पाटील यांच्या पाठीशी उभे आहेत. तसेच मिलिंद पाटील यांनी धनुष्यबाण हाती घेण्यामागे ‘वैकुंठ निवासाचा’ मूक पाठिंबा असल्याचीही चर्चा जोर धरू लागली आहे. आमदार आणि खासदारांच्या गटबाजीच्या राजकारणात मात्र सर्वसामान्य कार्यकर्ते सँडविचसारखे अडकले असल्याची भावना आता उघडपणे व्यक्त होत आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे बंड पेणच्या राजकारणात कोणते वळण घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





