हजारो वाहनचालकांचे आरसी बुक,परवाना रखडला

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

नवीन अथवा जुन्या वाहणाच्या नोंदणी नंतर वाहन चालकांना देण्यात येणारे आरसीबुक छापण्यासाठी नव्या कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र कंपनीची नेमणूक करण्यासाठी राबवण्यात आलेल्या निविदा प्रक्रिये दरम्यानच्या कालावधीत नवीन आरसी बुक छापण्याचे काम थंडावल्याने वाहनांच्या नोंदणी नंतर 80 ते 90 दिवसांचा कालावधी उलटूनही हजारो वाहनचालक अद्यापही आरसी बुक पासून वंचित आहेत. या मध्ये पनवेल प्रादेशिक परिवहन विभागात सात हजार 100 वाहने नोंदणी पुस्तकाअभावी रखडली आहेत.

नव्या अथवा जुन्या वाहनाची नोंदणी केल्यावर प्रादेशिक विभाग 45 दिवसाच्या आत वाहन मालकाच्या पत्त्यावर आरसी बुक (नोंदणी पुस्तकं) पाठवत असते.प्रादेशिक परिवहन विभागा अंतर्गत राज्यामध्ये एकूण 15 प्रादेशिक परिवहन कार्यालये व 35 उप प्रादेशिक परिवहन कार्यालये कार्यरत असून, या ठिकाणी नव्या अथवा जुन्या वाहणांची नोंदणी करण्यात येत असते. दररोज या ठिकाणी हजारोच्या संख्येने वाहणांची नोंदणी करण्यात येते.नोंदणी प्रक्रिये नंतर वाहनाच्या कागदपत्रांची शहानिशा करून स्मार्ट कार्ड स्वरूपाचे आरसी बुक वाहन मालकांच्या पत्त्यावर पाठवण्यात येते. राज्य सरकारने नेमलेल्या खाजगी कंपनीच्या माध्यमातून त्या त्या क्षेत्रातील प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयात आरसीबुक (स्मार्ट कार्ड) तयार करण्याचे काम केले जात होते. वाहन मालकांच्या पत्यावर पाठवण्याचे काम देखील त्या त्या कार्यालयातूनच केले जात होते.राज्य सरकारने घेतलेल्या नव्या नियमानुसार प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयात आता हे काम होणार नसून, राज्यात आता तीन जिल्ह्याच्या ठिकाणीच हे आरसी बुक (स्मार्ट कार्ड) तयार करण्यात येणार आहेत.

तीन विभागात होणार काम
अंधेरी (मुंबई), औरंगाबाद आणि नागपूर या ठिकाणी आरसीबुक ( स्मार्ट कार्ड ) तयार करून त्या त्या भागातील वाहन मालकांच्या पत्यावर पाठवले जाणार आहेत.

21 तारखे पासून नव्या कंपनीच्या कामाला सुरुवात
नव्या कंपनीच्या नेमणूकी करता राबवण्यात आलेली निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 21 ऑगस्ट पासून कंपनीच्या कामाला सुरवात झाल्याने लवकरच वाहन मालकांना आरसीबुक पाठवण्यास सुरवात होणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयात वाहणांची नोंदणी करण्यात आल्या नंतर कार्यालयातच आरसीबुक चे स्मार्ट कार्ड तयार करण्याचे काम या पूर्वी केले जात होते. या नंतर स्मार्ट कार्ड मध्ये असलेल्या चिप मध्ये वाहनाचा पूर्ण डेटा भरण्याचे काम प्रादेशिक परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांना करावे लागत होते आता मात्र हे काम शासनाने नेमलेल्या कंपनीचे कर्मचारीच करणार आहेत.

आर सी बुक आणि लायसन्स चे स्मार्ट कार्ड तयार करण्यासाठी शासनाने नवीन कंपनीची नेमणूक केली आहे. कंपनीने कामाला सुरवात केली आहे.पनवेल प्रादेशिक परिवहन विभागाकडून देखील रखडलेल्या स्मार्ट कार्ड चे काम लवकरच पूर्ण केले जाणार आहे.

निलेश धोटे, अधिकारी. आरटीओ
Exit mobile version