मांडवा जेट्टीजवळील आग विझविण्यास आरसीएफच्या कर्मचाऱ्यांना यश

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जुन्या मांडवा जेटी जवळील बोट बांधणी विभागात लागलेली आग आरसीएफ थळच्या अग्निशमन दल जवानांच्या तत्परतेने त्वरित विझविण्यात यश आल्याने संभाव्य मोठी हानी टाळता आली.

पहाटे चारच्या सुमारास जुन्या मांडवा जेटी जवळील बोट बांधणी विभागात जवळ मोठी आग लागल्याची सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांच्याकडून आरसीएफ थळच्या अग्निशमन केंद्रास प्राप्त झाली. त्याचसोबत जिल्हाधिकारी रायगड कार्यालय कडूनही आरसीएफ थळच्या अग्निशमन दलाच्या मदतीसाठी निर्देश देण्यात आले. आरसीएफ अग्निशमन विभागाने घटनेची गांभीर्याने दखल घेत, अग्निशमन बंब आणि कर्मचारी त्वरित घटनास्थळी रवाना केले. त्या ठिकाणी एका बोटीला आगीने पूर्ण वेढले असल्याचे संबंधित कर्मचार्‍यांच्या निदर्शनास आले. आरसीएफ थळचे अग्निशमन अधिकारी प्रशांथ पी.जी. यांच्या नेतृत्वाखाली योगेश घरत, रामचंद्र थळे, नितिन पाटील, तुषार कवळे आणि निकीतेश मुदिराज या अग्निशमन कर्मचार्‍यांनी शर्थीचे प्रयत्न करून पूर्ण पसरलेल्या आगीवर नियंत्रण मिळविले.

आगीच्या ठिकाणाहून अवघ्या काही फुटांवर नवीन बांधणी सुरू असलेल्या बोटी होत्या आणि वारा सुद्धा त्या दिशेने होता. त्यामुळे त्या नव्या बोटीला आगीच्या झळा लागू न देणे गरजेचे होते. आरसीएफ थळच्या अग्निशमन दल जवानांनी तत्पर आणि शर्थीचे प्रयत्न करून मोठे संभाव्य नुकसान टळले.

Exit mobile version