रोशन अकॅडमीचा अंतिम सामन्यासाठी प्रवेश
| पोयनाड | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चौदा वर्षाखालील मुलांच्या एकदिवसीय 40 षटकांच्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत रोशन क्रिकेट अकॅडमी कामोठे संघाने उपांत्य फेरीच्या झालेल्या सामन्यात प्रतिक क्रिकेट अकॅडमी पनवेल संघावर एकतर्फी विजय प्राप्त करत अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला आहे.
रोशन क्रिकेट अकॅडमी कामोठे संघाचा अंतिम सामना जगदीश क्रिकेट अकॅडमी अलिबाग संघाबरोबर लवकरच होणार आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना प्रतिक क्रिकेट अकॅडमी पनवेल संघाचा डाव 35.4 षटकात सर्व गडी बाद अवघ्या 39 धावसंखेवर संपला, त्यामध्ये यजुर्व घरतच्या 13 धावा वगळता कोणताही खेळाडू दुहेरी अंकातील धावसंख्या गाठू शकला नाही. रोशन क्रिकेट अकॅडमी कडून निखिल अहिरवाल यांनी सर्वाधिक 4 समर्थ यादव 3 तर आर्यन गाडे यांनी 2 फलंदाज बाद केले.अवघ्या 40 धावांचे लक्ष घेऊन फलंदाजीसाठी आलेल्या रोशन क्रिकेट अकॅडमी संघाने 12.5 षटकात 2 गडी गमावत 40 धावांचे लक्ष पूर्ण केले. त्यामध्ये मीत पाटील यांनी सर्वाधिक नाबाद 14 धावा काढल्या.पनवेल संघाकडून अधिराज जाधव यांनी 1 फलंदाज बाद केला. प्रशिक्षक रोशन अडे यांनी केलेल्या कामगिरीवर आनंद व्यक्त करत अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.






