| रायगड | खास प्रतिनिधी |
राज्याच्या सहकार क्षेत्रात अग्रणी असणार्या रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नुकताच 5500 कोटींचा व्यवसाय टप्पा पूर्ण केला आहे. सहकार क्षेत्रातील रोल मॉडेल बँक म्हणून बँकेने आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखले आहे. सातत्यपूर्ण कामगिरी, सहकारातील प्रभावी धोरण आणि तंत्रज्ञानस्नेही म्हणून बँकेने वेळोवेळी केलेल्या बदलामुळे बँकेला हे यश संपादित करता आले आहे.
राज्यातील सहकार क्षेत्र तसेच नाबार्डने बँकेच्या या कामगिरीचे कौतुक केले असून, विविध कार्यकारी सेवा, सहकारी संस्थांचे संगणकीकरण त्यांच्यासमवेत सांपत्तिक स्थितीमधील भरीव कामगिरी आणि प्रभावी व्यवस्थापन याबद्दल बँकेचे अभिनंदन केले आहे.
रायगड जिल्ह्यातील ग्राहकांनी बँकेवरती दाखविलेला विश्वास आणि बँकेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि संचालक मंडळ यांच्या दूरदृष्टीकोनातून हा प्रगतीचा आलेख उंचावण्यास मदत होत आहे. याबद्दल बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी आभार व्यक्त केले. तसेच, बँकेने या आर्थिक वर्षात सीकेवायसीचे काम पूर्ण केलेले आहे. त्यामुळे देशभरातील कोणत्याही बँकेत व्यवहार करण्यास रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ग्राहकाला एकच क्रमांक उपलब्ध होणार असून, त्याचाही लवकरच प्रचार आणि प्रसार ग्राहकांपर्यंत केला जाणार आहे, अशी माहिती वर्तक यांनी दिली.
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील शेती आणि शेती आधारित पूरक व्यवसाय तसेच त्याच्यासमवेत इतरही व्यवसाय आणि उद्योजकांना कर्जपुरवठा करीत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ग्राहकांचे बँकेशी तत्परतेचे नाते तयार झाले आहे. गृहनिर्माण सहकारी संस्था, पगारदार सहकारी संस्था, जिल्ह्यातील सहकारी पतपेढ्या, अर्बन को-ऑप. बँका या जिल्हा सहकारी बँकेशी जोडल्यामुळे सहकारातून सहकाराची वृद्धी हे आजवर बँकेचे चेअरमन आ. जयंत पाटील यांनी जपलेले धोरण आम्ही यशस्वीरित्या पुढे नेत आहोत आणि त्यामध्ये बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी बँकेच्या ग्राहकांशी आपुलकीचे नाते जपत आहेत. बँकेचे ठेवीदार, सभासद, कर्जदार आणि हितचिंतक यांचे मंदार वर्तक यांनी आभार व्यक्त केले.