आरडीसीसी बँक लवकरच गाठणार पाच हजार कोटींचा व्यवसाय टप्पा

| अलिबाग । प्रतिनिधी ।

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्याद्वारे जून 2023 या तिमाहीमध्ये बँकेने केलेला व्यवसायाची आकडेवारी जाहीर केलेली असून, बँकेने आपला व्यवसाय 4924.15 कोटींच्या पुढे गेल्याने बँकेचे ग्राहक, सभासद आणि हितचिंतक यांचे आभार मानले आहेत. 31 मार्च 2022 या आर्थिक वर्षांनंतर वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेच्या सभासदांना संबोधित करताना चेअरमन आमदार जयंत पाटील यांनी बँक 2023 या वर्षाच्या अखेरीस पाच हजार कोटींचा व्यवसाय टप्पा गाठणार असा विश्वास व्यक्त केला होता आणि बँकेची वाटचाल त्याच दिशेने सुरू असल्याचे हे द्योतक आहे, असे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी सांगितले.

बँकेचे चेअरमन आमदार जयंत पाटील यांनी यावर्षी होणार्‍या वार्षिक सर्वसाधारण सभेत आपण याबाबत काही विशेष संस्था तसेच सहकार क्षेत्रात अमूल्य योगदान असणार्‍या व्यक्तींचा सत्कार करणार असल्याचे जाहीर केले. शिवाय बँकेच्या आजवरच्या वाटचालीत ग्राहकांनी जो विश्वास दाखविला आहे त्याबद्दल देखील त्यांनी बँकेच्या ग्राहकांना धन्यवाद दिले आहेत. तसेच, शासनाचे आभार मानताना ते म्हणाले की, सहकार खाते, नाबार्ड यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे बँकेला प्रगती साधणे शक्य होते. रायगड जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्या करप्रणाली मध्ये समन्वय साधण्याकरिता सुरू करण्यात आलेल्या अमृतग्राम प्रणाली सारख्या योजना अंगिकारल्यामुळे देखील बँकेच्या व्यवसायमध्ये वाढ होण्यास मदत झाली.

 बँक आर्थिक प्रगती करीत असताना सामाजिक जाणिवा ठेवून आपले कार्य करत असल्याचे सांगून आमदार जयंत पाटील यांनी सद्यस्थितीमध्ये इरशालवाडीमध्ये दुखद घटना घडल्याने त्यांना प्राधान्याने बँकिंग सेवा देण्याचे काम बँकेच्या कर्मचार्‍यांच्या वतीने सुरू आहे, याबाबत माहिती दिली. शासनाच्या वतीने तेथील दुर्घटनाग्रस्त नागरिकांना तातडीने आर्थिक मदत मिळावी याकरिता बँकेमध्ये खाते असणे महत्वाचे असते, अशावेळी बँकेच्या केंद्र कार्यालयामधून एक टिम चौक आणि खालापूर या बँकेच्या दोनही शाखेमध्ये पाठविण्यात आलेली असून शासनाला आवश्यक ते सहकार्य करण्याची भूमिका स्थानिक तहसिलदार यांच्याशी समन्वय साधून बँकेच्या वतीने निभावण्यात येत आहे. दुर्घटनाग्रस्त नागरिकांची कोणत्याही बँकेत खाती नसल्याने त्यांना आर्थिक अडचणीना सामोरे जाऊ लागू नये म्हणून, बँकेच्या वतीने कोणतीही रक्कम न घेता सोमवार दि.24 जुलैपर्यंत 44 कुटुंबाची खाती आतापर्यंत प्रत्यक्षात दुर्घटनाग्रस्त नागरिकांना भेटून सुरू करण्यात आली आहेत. शिवाय पुढे देखील हे काम चालूच राहील, असेही आमदार जयंत पाटील यांनी सांगितले.

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी यावेळी सप्टेंबर 2023 पूर्वीच बँक पाच हजार कोटींचा व्यवसाय टप्पा सहज पार करेल असे सांगितले, शिवाय मार्च 2024 पर्यंत बँकेने 5500 कोटींच्या व्यवसायाचे ध्येय निश्चित केलेले असून, याकरिता बँकेचे चेअरमन आमदार जयंत पाटील यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, संचालक मंडळाची एकत्रित भूमिका यामुळे हे शक्य होत आहे, असेही मंदार वर्तक यांनी सांगितले. बँकेच्या नफाक्षमतेमध्ये झालेली लक्षणीय वाढ याबाबत देखील त्यांनी आकडेवारी जाहीर केली. बँकेने सन 2021-22 या आर्थिक वर्षात  36.98 कोटींचा ढोबळ नफा कमविला होता. त्यामध्ये वाढ होवून 2022-23 मध्ये बँकेने हा नफा तब्बल 51.00 कोटींपर्यंत नेला आहे. या आर्थिक वर्षात देखील बँकेच्या नफ्यामध्ये वाढ करण्यात आम्हाला यश मिळेल, याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी आपल्या म्हणण्यातून खात्री व्यक्त केली. शिवाय बँकेच्या विविध लघुकर्ज योजना आणि आकर्षक व्याजदराच्या ठेव योजनांना गतआर्थिक वर्षात जो प्रतिसाद मिळाला त्याआधारे या आर्थिक वर्षात गणेशोत्सव आणि दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर  नवीन लोकोपयोगी कर्जयोजना जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 

Exit mobile version