| अलिबाग | वार्ताहर |
कबड्डीच्या मैदानात रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संघाने कामगार मैदान परेल या ठिकाणी संपन्न झालेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये उपविजेतेपद पटकाविले आणि सर्व प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण मंडळाच्या वतीने औद्योगिक व व्यावसायिक कामगारांसाठी 27 वी खुली कबड्डी स्पर्धा दिनांक 2 ते 5 फेब्रुवारी या कालावधीत मुंबईतील कामगार मैदानात संपन्न झाली. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून तब्बल 159 संघांनी सहभाग घेतला. कोल्हापूरच्या कुणबी कासारी संघाला रायगड जिल्हा बँकेच्या संघाने एकतर्फी सामन्यात पराभूत करीत अंतिम फेरीत प्रवेश केला होता, अंतिम फेरीत जेएसडब्लू (रायगड) या संघाविरुद्ध झालेल्या चुरशीच्या सामन्यात मात्र रायगड जिल्हा सहकारी बँकेला निसटता पराभव स्विकारावा लागला. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांनी बरोबरी साधली होती परंतु उत्तरार्धात जेसडब्लू रायगड संघाने रायगड जिल्हा सहकारी बँकेवर सरशी साधली. यावेळी बँकेला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सदर पुरस्कार आ. भाई जगताप, मुंबई कबड्डी फेडरेशन अध्यक्ष यांचे हस्ते देण्यात आला. सामन्यांमधील सर्वोत्कृष्ठ खेळाडू म्हणून आरडीसीसी बँक, अलिबाग संघातील समाधान मोरे याला गौरवण्यात आले.
बँकेचे चेअमरन आ. जयंत पाटील यांनी तसेच बँकेचे विद्यमान संचालक मंडळ यांनी या संघाच्या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी देखील बँकेच्या संघाचे अभिनंदन केले असून खेळाडूंना आवश्यक असणार्या सर्व सोयी आणि पाठिंबा बँकेच्या वतीने देण्यात येणार आहे असेही त्यांनी सर्वांना आश्वासित केले. या संघाचे मुख्य मॅनेजर म्हणून राजेंद्र जुईकर तर सह मॅनेजर म्हणून अजित भगत यांनी काम पाहिले.