RDCC Bank: आरडीसीसी बँकेची 8 हजार कोटींची विक्रमी झेप

विश्वास, सहकार आणि विकासाचा प्रवास; चार वर्षांत दुपटीपेक्षाही अधिक वाढ

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 8,000 कोटींच्या एकूण व्यवसायाचा ऐतिहासिक टप्पा पार करत सहकार क्षेत्रात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. विशेष म्हणजे, मागील अवघ्या चार वर्षांत बँकेच्या व्यवसायात दुपटीपेक्षाही अधिक वाढ झाली आहे. सहकाराच्या माध्यमातून ग्राहककेंद्री सेवा, आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार आणि आधुनिक बँकिंगचा प्रभावी संगम साधणाऱ्या रायगड जिल्हा बँकेने हा टप्पा गाठत महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात राज्यातील आपले अग्रस्थान अधिक दृढ केले आहे.

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा हा प्रवास केवळ व्यवसायवाढीचा नाही, तर गेल्या 65 वर्षांत ग्राहक, सभासद, शेतकरी, महिला बचतगट, व्यापारी, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण केलेल्या अढळ विश्वासाचा आहे. सहकार म्हणजे केवळ आर्थिक व्यवहार नसून, समाजाच्या विकासाची आणि लोकांच्या प्रगतीची चळवळ आहे, हे बँकेने आपल्या कार्यातून सातत्याने सिद्ध केले आहे. त्यामुळेच आज रायगड जिल्हा बँकेचा विकासाचा प्रवास राज्यातील सहकार क्षेत्रासाठी प्रेरणादायी मानला जात असून, 8,000 कोटींचा व्यवसाय हा त्या विश्वासाचा आणि सातत्यपूर्ण कार्याचा भक्कम पुरावा ठरला आहे.

रायगड जिल्हा बँकेने गेल्या काही वर्षांत डिजिटल बँकिंग, कोअर बँकिंग प्रणाली, रुपे केसीसी कार्ड, स्वयं सहाय्यता गटांचे सक्षमीकरण, आधुनिक बँकिंग सुविधा आणि ग्राहकाभिमुख विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांनाही आधुनिक बँकिंगचा लाभ मिळत असून, बँकेबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

याबाबत बँकेचे अध्यक्ष माजी आमदार जयंत पाटील यांनी यावेळी राज्यातील तसेच जिल्ह्यातील सहकारी संस्था, बँका,पतसंस्था, शासकीय आणि निमशासकीय आस्थापना यांचे विशेष आभार व्यक्त करताना बँकेच्या या यशामध्ये त्यांचा महत्वाचा सहभाग आहे असे आवर्जून नमूद केले. तसेच 8,000 कोटींचा व्यवसाय हा केवळ आर्थिक टप्पा नसून, रायगड जिल्ह्यातील ग्राहक, सभासद, शेतकरी आणि नागरिकांनी बँकेवर दाखविलेल्या अढळ विश्वासाचा सन्मान आहे असे प्रतिपादन केले.

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी आपल्या मनोगतात बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाचे आभार व्यक्त करत ही कामगिरी एका दिवसात घडलेली नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून राबविण्यात आलेले सुयोग्य नियोजन, आर्थिक शिस्त, नियामक सूचनांचे काटेकोर पालन, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, आणि ग्राहकाभिमुख सेवा याबाबत मत व्यक्त केले. तसेच मार्च 2028 पूर्वी बँकेचा व्यवसाय हा 10,000 कोटी तर स्वनिधी 1000 कोटींपर्यंत पोहचेल, अशी खात्री त्यांनी अभिमानाने व्यक्त केली.

बँकेचा गौरवशाली वारसा, सातत्याने वाढणारी नफाक्षमता, आधुनिक बँकिंगचा स्वीकार आणि समाजहिताची भूमिका या बळावर रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सहकार क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळेच 8,000 कोटींचा व्यवसाय हा त्या प्रवासातील महत्त्वाचा मैलाचा दगड असून, हा टप्पा रायगडच्या विकासाला अधिक वेग देणाऱ्या आर्थिक शक्तीचा विस्तार ठरणार आहे.

Exit mobile version