डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम
| मुरुड जंजिरा | प्रतिनिधी |
मुरुड व मजगाव अशा सर्वच ठिकाणी दहा दिवसांच्या बाप्पांचे शनिवारी जल्लोषात विसर्जन पार पडले. विसर्जन सोहळा साजरा झाला, पण विसर्जनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे रविवारी सकाळी मुरुड, माजगाव, राजपुरी, एकदरा, समुद्रकिनारी जवळपास 149 प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती वाहून आल्या होत्या. सकाळी समुद्राला ओहोटी लागल्यावर किनारी वाहून आलेल्या मूर्ती डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे गणेशमूर्तींचे 34 श्रीसदस्यांनी पुन्हा खोल समुद्रात बोटीच्या साह्याने नेऊन विसर्जित केल्या.
दरम्यान, मूर्तींचे पुन्हा विसर्जन केल्यानंतर सपूर्ण समुद्रकिनारा स्वच्छ केला. तसेच येणाऱ्या पर्यटकांना भग्न मूर्ती दिसू नये म्हणून पहाटे सहा वाजताच श्रीसदस्यांनी किनाऱ्यावर येत काम सुरू केले. वाहून आलेल्या मूर्तींना एकत्रित करून छोट्या बोटीतून खोल समुद्रात नेऊन पुन्हा विसर्जित करण्यात आल्या. डॉ. नानासाहेब प्रतिष्ठानतर्फे श्रीसदस्य गेले अनेक वर्षे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे विसर्जन करण्याचे काम करत आहेत, तसेच किनारेही स्वच्छ करण्यात येतात. पण, जनजागृती होऊन मतपरिवर्तन होणे गरजेचे आहे, त्यासाठी सुशिक्षित लोकांनी पुढे येऊन स्वतः शाडूच्या मूर्ती आणणे गरजेचे आहे, असे मत श्रीसदस्यांनी व्यक्त केले.







