। बांदा । वृत्तसंस्था ।
वाचनामुळे स्मरणशक्ती, मनाची एकाग्रता वाढते. पुस्तकेच माणसाला समृद्ध करतात. राजमाता जिजाऊंनी बाल शिवाजीला पराक्रमाच्या गोष्टी सांगून त्यांच्या शौर्याला आकार दिला होता. एखादे पुस्तक, पुस्तकातले पान आयुष्य बदलते. एक वाक्य आयुष्याचे ध्येय ठरू शकते, एवढी ताकद वाचनात आहे, असे प्रतिपादन वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून येथील जिल्हा परिषद केंद्रशाळा क्र. 1 मध्ये आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत अनंत भाटे यांनी केले.
शालेय रंगभरण व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. पहिली ते चौथी गटासाठी घेण्यात आलेल्या रंगभरण स्पर्धेतील अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक विजेते शरण्या वायंगणकर, समर्थ पाटील, जागृती शिंदे यांना तसेच विहान गवस, रिया गवस यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. पाचवी ते सातवी गटासाठी घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक विजेते स्वामिनी तर्पे, अदिती सावंत, मनोज मिशाळ तसेच अंकिता झोन व रोशनी बोरपटे यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला. विजेत्यांना रोख पारितोषिक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, कार्यवाह राकेश केसरकर, संचालिका स्वप्नीता सावंत, लाड मित्रमंडळाचे सचिव संदीप नार्वेकर, अंकुश माजगावकर, मराठी भाषा समन्वयक परब, मुख्याध्यापक शांताराम असनकर आदी मान्यवर उपस्थित होते.