आंतरराष्ट्रीय विमानतळ क्षेत्र विकास कामांकरिता सज्ज

। नवी मुंबई । वार्ताहर ।
सिडको महामंडळातर्फे साकारण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प क्षेत्रातील गावांमधील एकूण 3070 बांधकामे निष्कासित करण्यात आली असून 1160 हे. क्षेत्रफळ विमानतळ सवलतदार यांना हस्तांतरीत करण्यात आले आहे. तसेच या गावांतील सुमारे 5,000 हून अधिक कुटुंबांचे पुनर्वसन आणि पुन:स्थापना क्षेत्रातील पुनर्वसन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यामुळे सिडकोतर्फे नवी मुंबई विमानतळ प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे.

सिडकोतर्फे पनवेल तालुक्यामध्ये 10 गावे संपादित करून 1160 हेक्टर क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प विकसित करण्यात येत आहे. एका राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी या गावांतील ग्रामस्थ देत असलेले योगदान लक्षात घेऊन सिडकोतर्फे या प्रकल्पबाधितांना महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेले, देशातील सर्वोत्तम पुनर्वसन पॅकेज देण्यात आले आहे. तसेच विमानतळ प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाकरिता सिडकोतर्फे विमानतळ क्षेत्रालगत पुष्पक नगर हे सर्व भौतिक, सामाजिक व सांस्कृतिक पायाभूत सोयी सुविधांनी परिपूर्ण पुनर्वसन आणि पुन:स्थापना क्षेत्र विकसित करण्यात येत आहे.
सार्वजनिक वापरातील इमारती,चर्च तसेच सार्वजनिक व खासगी मालकीची मंदिरे मिळून एकूण 56 मंदिरांचे पुनर्वसन क्षेत्रात स्थलांतर करण्यात आले असून ग्रामस्थांच्या सहकार्याने मूर्तींची सन्मानपूर्वक प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. समाज मंदिर, शाळा आणि स्मशानभूमी मिळून एकूण 27 बांधकामे निष्कासित करण्यात आली आहेत. विमानतळ क्षेत्रातील महत्त्वाची विकासपूर्व कामे यापूर्वीच पूर्ण झाली आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी प्रकल्पबाधित व ग्रामस्थांचे नेहमीच महत्त्वपूर्ण योगदान लाभले आहे.

प्रकल्पबाधितांच्या सहकार्यामुळेच विमानतळ प्रकल्पातील आजवरचे महत्त्वाचे टप्पे सिडकोने यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पूर्ण क्षेत्र विकासासाठी उपलब्ध करून देण्याचे आव्हानात्मक काम देखील यास अपवाद नव्हते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प नियोजित वेळेनुसार पार पडत असून हा प्रकल्प मार्गी लागला आहे.

डॉ. संजय मुखर्जी

Exit mobile version