बंडखोर आमदार एकनाथ शिंदे मुंबईत परतणार?

। मुंबई । प्रतिनिधी ।
एकनाथ शिंदे गटाच्या बंडानंतर महाराष्ट्रात निर्माण झालेला सत्तासंघर्ष आता निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 12 जुलैपर्यंत बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई होणार नसल्याचं स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे गटाकडून महाविकास आघाडीला धक्का देण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे हे स्वत: मु्ंबईत येण्याची शक्यता असून राज्यपालांना सरकारला पाठिंबा काढला असल्याचे पत्र दिले जाणार आहे. त्यामुळे 12 जुलैपर्यंतच्या होऊ शकणाऱ्या संभाव्य घडामोडी लक्षात घेता महाविकास आघाडीसमोर सरकार वाचवण्याचं आव्हान असणार आहे.

शिंदे गटाकडून अविश्वास प्रस्ताव मांडला गेल्यास महाविकास आघाडीसाठीची ती अग्निपरीक्षा असणार आहे. या संभाव्य राजकीय संकटाला तोंड देण्यासाठी महाविकास आघाडीतल्या प्रमुख नेत्यांच्या बैठकांचं सत्र सुरु झाले आहे. सोमवारी काँग्रेस नेत्यांनी मातोश्री गाठत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्याशिवाय, महााविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार कोणती पावले उचलणार याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शिंदे गटाची आज महत्त्वाची बैठक
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानंतर आज एकनाथ शिंदे गटाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. विधीमंडळात आपला पक्ष खरा असल्याचा दावा शिंदे गटाकडून आणि शिवसेनेकडून करण्यात येत आहे. सुप्रीम कोर्टाकडून मिळालेल्या निर्देशानंतर आजच्या बैठकीत पुढील पावलांबाबत चर्चा होणार आहे. सरकारचा पाठिंबा काढला असल्याचे पत्र दिल्यानंतरही कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यावरही शिंदे गटात चर्चा होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version