महायुतीमध्ये बिघाडी, दळवींना बसणार फटका; तटकरे कोणता धर्म पाळणार?
। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यामध्ये महायुतीत आलबेल असल्याचा दावा भाजप, शिंदे गट कायमच करीत आले आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून आ. दळवी आणि भाजपप्रणित अपक्ष उमेदवार दिलीप भोईर यांच्यातील कुरघोड्या चव्हाट्यावर आल्या आहेत. गेले कित्येक दिवस बंडखोरी होणार नसल्याचे ठामपणे सांगणार्या महायुतीच्या पदाधिकार्यांना आज भोईरांच्या गळ्यातील कमळाच्या माळेने चांगलीच चपराक बसली आहे. अखेर अलिबाग-रोहा-मुरुड मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली असल्याने दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांना हरविण्याचा चंग बांधला आहे.
महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. अलिबाग विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी शिंदे गटातील महेंद्र दळवी यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर मित्रपक्षातील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, यावेळी अनेक भाजपचे कार्यकर्ते खुलेआमपणे सभेत सहभागी झाले असल्याने भाजप भोईरांसोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता महेंद्र दळवींची वाट बिकट झाली आहे. अशातच महायुतीचे रायगड जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे कोणासोबत राहणार, असा सवाल जनतेकडून उपस्थित केला जात आहे.
अलिबाग विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदे गट विरुध्द भाजपचा वाद कायमच चर्चेत आला आहे. अलिबाग-रोहा रस्त्याच्या श्रेयवादावरूनही महेंद्र दळवी व दिलीप भोईर यांच्यात वाद झाला होता. अनेक वेळा दळवींनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दुय्यम दर्जाची वागणूकही दिल्याची चर्चा झाली आहे. त्यामुळे पुन्हा महायुतीमधील शिंदे गट विरुद्ध भाजपमधील युद्ध विधानसभा निवडणुकीत पेटू लागले आहे. महेंद्र दळवी यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी भाजपचे बोटावर मोजण्याइतके कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी खासदार तटकरे यांनी थोड्या वेळाचे दर्शन देऊन सभेत सहभागी होणेही टाळले होते.
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर यांनी मंगळवारी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला. त्यांच्यासोबत भाजपच्या जिल्हा सचिवांसह अनेक भाजपचे सच्चे कार्यकर्ते उपस्थित होते. भोईर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला असला, तरीदेखील त्यांनी भाजपचे चिन्ह गळ्यात घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ते भाजपमध्येच असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उरणमधील ‘बालदी पॅटर्न’प्रमाणे भाजप भोईर यांच्यासोबत राहून शिंदे गटाचे उमेदवार दळवींना पाडण्याचा डाव आखत असल्याचे आता शिक्कामोर्तब झाले आहे.
तटकरे गेम करणार...
महेंद्र दळवी यांच्यासह त्यांच्या बगलबच्चांनी ते मंत्री होण्याचे स्वप्न पाहिले आहे. दळवी निवडून आल्यावर मंत्री झाल्यास आदिती तटकरे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आदिती तटकरे यांचे पालकमंत्रीपद घालविण्यामध्ये दळवींचा सहभाग होता. त्यावेळी महेंद्र दळवी यांनी शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत आदिती तटकरे यांचं पालकमंत्रीपद घालविलं होतं. त्याचा बदला घेण्याच्या तयारीत तटकरे असल्याची चर्चाही सध्या सुरु आहे. परिणामी, मुलीचे भविष्य धोक्यात टाकण्याऐवजी दळवी व गोगावलेंना बसविण्याचे धोरण तटकरेंनी आखले असल्याची माहिती समोर आली आहे.
दळवींसह केणींची काढली लायकी
कालच्या दिवशी याच व्यासपीठावर कोणीतरी माफी मागितली. मोठ्या विश्वासाने मते देऊन मतदारांनी लोकप्रतिनिधी म्हणून दळवींना विधानसभेत निवडून पाठविले. पाच वर्षांत त्यांनी काय केलं. आता माफी मागण्याची गरज काय होती. निवडणुकीत सहानुभूती मिळविण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला. जनतेने विकासासाठी एक हजार 825 दिवस तुम्हाला दिले होते. मग या कालावधीत काय काम केलं? शपशविधी वगळता कधीही हा आमदार अधिवेशनात प्रश्न उपस्थित करताना दिसला नाही, असा संतप्त टोला भोईर यांनी लगावला. पाच वर्षात एक साधी आमसभा घेतली नाही. त्या सभागृहात दळवी यांना फक्त शपथ घेताना पाहिले. परंतु, पाच वर्षांत कधीही सभागृहात जनतेचे प्रश्न मांडताना दिसले नाहीत. राजा केणीने एकतरी निवडणूक जिंकून दाखवावी. लायकी नसणार्यांनी बोलू नये, असा खोचक चिमटाही त्यांनी केणीला काढला.
कोण तो भ...?
महेश मोहिते यांनी पक्षविरोधी कारवाई होईल, आम्ही प्रसाद देऊ, असे सच्चा कार्यकर्त्याला सांगितले. परंतु, प्रसाद बनविण्यासाठी कालथा लागतो. तो गरम झाल्यावर खाली ... देऊ, असा टोला भोईरांनी लगावला. 23 महिन्यांपूर्वी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. त्यावेळी तोच भ... पक्ष सोडून चालला होता, असे भोईर म्हणाले.