18 पैकी 13 मतदारसंघात अपक्षांचे आव्हान
| ठाणे | प्रतिनिधी |
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीकरिता 288 मतदारसंघासाठी मंगळवारी (दि.29) ऑक्टोबर पर्यंत 7 हजार 995 उमेदवारांचे 10 हजार 905 अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली. मात्र, यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात बंडखोरांचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीत पक्षाने अधिकृत उमेदवार दिल्यानंतर इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे काही इच्छुकांनी केवळ तिकिटासाठी सारे असं म्हणत पक्षाची पर्वा न करता दंड थोपटत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ठाणे जिल्ह्यात बंड केलेले सर्वाधिक उमेदवार दिसून येत आहेत. ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांपैकी 13 मतदारसंघांत महायुती आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध त्याच पक्षाच्या किंवा मित्रपक्षाच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांनी बंडखोरी केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधील प्रत्येकी तीन पक्षांतील इच्छुकांची संख्या जास्त आहे. मात्र उमेदवारी देतेवेळी पक्षांने समन्वय न साधल्याने उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवारांनी बंड पुकारले आहे.
ठाणे शहर, ओवळा-माजिवडा, मुंब्रा-कळवा, डोंबिवली आणि शहापूर या पाच विधानसभा मतदारसंघांत ठळकपणे बंडखोरी दिसत नाही. पण पाचपाखाडी, ऐरोली, बेलापूर, भिवंडू पूर्व व पश्चिम, कल्याण ग्रामीण, कल्याण पूर्व व पश्चिम, उल्हासनगर, अंबरनाथ, मुरबाड, मीरा-भाईंदर मतदारसंघात बंडखोरांकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आता 4 नोव्हेंबर रोजी उमेदावीर अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. तोपर्यंत बंडखोरांना थंड करण्याचे आव्हान सर्वच पक्षांपुढे असणार आहे. त्यानंतर ठाणे जिल्ह्यात किती जागांवर बंडखोर आपली उमेदवारी अर्ज कायम ठेवतात, हे चित्र स्पष्ट होईल.