महायुती तुटली! श्रीवर्धनमध्ये शिंदे गटाचे बंड

अदिती तटकरे विरोधात देणार उमेदवार; शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांची माहिती

। पाली/बेणसे । धम्मशिल सावंत ।

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात महायुतीत संघर्ष होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून आदिती तटकरे यांच्या विरोधात उमेदवार रिंगणात उतरण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. कर्जत – खालापूर विधानसभा मतदारसंघात सुनिल तटकरे सातत्याने सुधाकर घारेंना ताकद देण्याचे काम करत आहेत. आमदार नसलेल्या माणसाला कोट्यवधींचा निधी दिला जातो. तटकरे यांनी महायुतीचा धर्म पाळावा, महायुतीतील आमदार महेंद्र थोरवे यांच्याविरोधात घारे निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आम्ही श्रीवर्धन मतदारसंघातहीआमचा उमेदवार उभा करू, जनतेने उमेदवाराची मागणी केली आहे. खासदारकीच्या वेळेला तटकरे यांना आम्ही मदत केली, मात्र ते आता युतीचा धर्म पाळत नाहीत, असा घणाघाती आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी केला.

श्रीवर्धन, दिवेआगर येथे पत्रकार परिषद घेऊन जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्यासह श्रीवर्धन तालुका प्रमुख सुरेश मिरगल, रोहा तालुका प्रमुख ॲड. मनोजकुमार शिंदे व अन्य प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते बोलत होते.

राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध शिंदेंची शिवसेना एकमेकांविरोधात भिडणार असल्याने रायगडच्या महायुतीत संघर्षाची ठिणगी पडली असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. घोसाळकर म्हणाले की, श्रीवर्धन मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. या मतदार संघातून तीनवेळा शाम सावंत निवडून आले होते. नारायण राणे यांनी राजीनामा दिल्यानंतर ज्येष्ठ नेते तुकाराम सुर्वे यांच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जनतेने निवडून दिले. त्यामुळे श्रीवर्धन मतदारसंघावर खरा हक्क शिवसेनेचा आहे. म्हणून शिवसेनेचा श्रीवर्धन मतदार संघावर दावा आहे, असे घोसाळकर यांनी स्पष्ट केले.

श्रीवर्धन मतदार संघाची उमेदवारी शिवसेनेला मिळावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. ही निवडणूक ताकदीने लढवून जिंकून येण्याची तयारीदेखील इच्छुक उमेदवारांनी केली आहे. महायुतीच्या सात जागा आम्हीच जिंकणार असं म्हटलं होत, मात्र कर्जत -खालापूर मतदार संघात जर शिवसेनेला आव्हान दिल जातं असेल तर आम्ही श्रीवर्धन मतदारसंघात 100 टक्के निवडणूक लढविणार आहोत. शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख म्हणून मी स्वतः तसेच रोहा तालुका प्रमुख ॲड. मनोजकुमार शिंदेदेखील विधानसभा लढविण्यास इच्छुक आहोत. आम्ही या मतदार संघावर दावा करीत असून आम्हाला उमेदवारी मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पक्ष प्रतोद आमदार भरत गोगावले यांच्याकडे केली आहे.

विकासकामांच्या बॅनरवर मुख्यमंत्री व पालकमंत्री यांचा फोटो लावला जात नाही. भूमिपूजन, उदघाट कार्यक्रमास बोलवत नाहीत. शासकीय कार्यक्रमाचे निमंत्रण दिले जातं नाही. विकासनिधी वाटपामध्ये देखील भेदभाव केला जातो, असा आरोप करीत शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली. 2019 मध्ये विनोद घोसाळकर यांनी निवडणूक लढवली होती. त्यांना चांगले मताधिक्य मिळाले होते. मतदार संघात आमचा चांगला जनसंपर्क आहे. शिवाय शिवसेना पक्ष देखील संघटनात्मकदृष्ट्या मजबूत व बलाढय आहे. याचा आम्हाला फायदा होईल, असे घोसाळकर म्हणाले. आदिती तटकरे या महायुतीच्या मंत्री आहेत. मात्र शिवसेनेला सावत्रपणाची वागणूक देत आहेत. यापूर्वी देखील ठाकरे शिवसेनेत असताना बंड झाले होते. त्याचीच पुनरावृत्ती होईल, यावर घोसाळकर म्हणाले की महायुतीचा धर्म सर्वांनी पाळला पाहिजे अन्यथा आम्हीदेखील उमेदवार उभे करू, असे आव्हान घोसाळकर यांनी दिले आहे.

Exit mobile version