माँसाहेबांच्या रथयात्रेचे पाचाडच्या समाधीस्थळी स्वागत

| पोलादपूर | वार्ताहर |

14 जून रोजी मातृतिर्थ सिंदखेडराजा येथून प्रस्थान झालेल्या राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या रथयात्रेचे शिवराजधानी रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथील समाधीस्थळी स्वागत करण्यात आले. राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या 350 व्या पुण्यतिथीनिमित्त नवयुग विद्यापीठ ट्रस्टचे चेअरमन अ‍ॅड. रणजितसिंह जाधवराव आणि अश्‍विनीराजे जाधवराव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा स्वागताचा कार्यक्रम झाला.

यदूकुलभूषण राजे लखोजीराव जाधवराव प्रतिष्ठान सिंदखेडराजा तथा समस्त राजे जाधवराव परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेल्या रथयात्रेचे प्रस्थान मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर, खा. प्रतापराव जाधव, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, बालाजी देवस्थानचे विश्‍वस्त राजे विजयसिंह जाधवराव, सिंदखेडराजाचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, माजी आमदार डॉ. तोताराम कायंदे, सिंदखेडराजाचे माजी नगराध्यक्ष सतीश तायडे, सिंदखेडराजाचे माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. नाझीर काझी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यानंतर ही रथयात्रा जालना, घनसावंगी, बार्शी रोड बीड, पाटोदा, कर्जत जामखेड, बारामती, माळेगाव, वडगांव निंबाळकर, भुईंज, ओझर्डे, वाई, प्रतापगड, पोलादपूर व महाडमार्गे राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या 350 व्या पुण्यतिथीदिनी सोमवार, दि. 17 जून रोजी पाचाड येथे पोहोचली.

सकाळी साडेसात वाजता राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या समाधीस्थळी पाच विहिरींच्या पाण्याने समाधीला जलाभिषेक करण्यात आला. यावेळी अ‍ॅड. रणजितसिंह जाधवराव आणि अश्‍विनीराजे जाधवराव यांच्या प्रमुख उपस्थितीत रथयात्रेच्या सांगतेसोबत जिजाऊ माँसाहेबांच्या विचारांची ज्योत प्रज्ज्वलित करण्यात आली. याप्रसंगी विविध मान्यवरांकडून राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे राष्ट्रविषयक विचारांचे प्रवर्तन करण्यात आले.

Exit mobile version