मुंबई-गोवा महामार्गाचे पुनश्‍च हरीओम

काँक्रिटीकरण,दुपदरीकरणाचा आज प्रारंभ
नितीन गडकरी यांची उपस्थिती
| अलिबाग | प्रतिनिधी |
गेले अनेक वर्षे विविध कारणांनी रखडलेला मुंबई -गोवा महामार्गाच्या काँक्रिटीकरण आणि दुपदरीकरणाच्या कामाचा प्रारंभ गुरुवारी ( 30 मार्च) केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते खारपाडा, ता.पेण येथे करण्यात येणार आहे. या कामांच्या पुर्ततेनंतर हा मार्ग सुसाट होईल,अशी अपेक्षा कोकणवासियांकडून व्यक्त केली जात आहे.

या रखडलेल्या महामार्गाचे काम तातडीने पूर्ण केले जावे,यासाठी शेकापचे आम. जयंत पाटील यांच्यासह कोकणातील सर्वच लोकप्रतिनिधी सातत्याने विधिमंडळात मुद्दा उपस्थित करुन सरकारचे लक्ष वेधले होते.नुकत्याच संपलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशीही याच मुद्यावरुन त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे महामार्गाचे काम पूर्ण करा,अशी मागणी केली होती.

तीन प्रकल्पांचा प्रारंभ
कोकणासाठी महत्वपूर्ण असलेल्या महामार्गावरील पनवेल ते कासू , राष्ट्रीय महामार्ग क्र.965 डीडी (राजेवाडी फाटा ते वरंध गाव) तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र.965 डीडी (वरंध गाव ते पुणे जिल्हा हद्द) या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासह दुपदरीकरण करणे, अशा एकूण 63.900 किलोमीटर लांबी व एकूण 414.68 कोटी मूल्य असलेल्या या तीन प्रकल्पांचा भूमीपूजन सोहळा कार्यक्रम गडकरी यांच्या हस्ते खारपाडा टोल प्लाझाजवळ, खारपाड गाव, ता.पनवेल येथे गुरुवारी सकाळी 8.30 वाजता संपन्न होणार आहे.

या भूमीपूजन सोहळा कार्यक्रमासाठी पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, खा.कुमार केतकर, श्रीरंग बारणे, सुनील तटकरे, आ.जयंत पाटील, निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, ज्ञानेश्‍वर म्हात्रे, भरत गोगावले, प्रशांत ठाकूर, रविंद्र पाटील, आदिती तटकरे, महेंद्र थोरवे, श्री.महेश बालदी, यांची उपस्थिती राहणार आहे.

Exit mobile version