| नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांची अभूतपूर्व गर्दी झाली आहे. सलग सुट्ट्या आणि उन्हाळी पर्यटन हंगामातील शेवटचा विकेंड साजरा करण्यासाठी सुमारे 50 हजार पर्यटक माथेरानमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, पर्यटकांच्या गर्दीमुळे माथेरानमधील सर्व प्रेक्षणीय स्थळे, माथेरान बाजारपेठ, माथेरान नेरळ घाटरस्ता, ई-रिक्षा आणि हॉटेल, लॉजदेखील हाऊसफुल आहेत. यंदाच्या पर्यटन हंगामातील सर्वाधिक गर्दीचा असा हा विकेंड ठरला आहे.
मान्सूनचा पाऊस सुरू होण्याची आस सर्व पाहत असून वातावरणात निर्माण झालेल्या उष्म्यामुळे माथेरानकडे पर्यटकांची पावले पडू लागली आहेत. त्यात सलग सुट्ट्यांचा विकेंड असल्याने माथेरान शुक्रवारपासून हाऊसफुल झाले आहे. शनिवारी माथेरान पर्यटकांच्या गर्दीने ओसंडून वाहत असताना माथेरानमध्ये येणारी पावसाची सर यामुळे पर्यटक आणखी आनंदले आहेत. रविवारी पर्यटकांच्या तुडुंब गर्दीमुळे नेरळ माथेरान घाटरस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. माथेरान येथील दस्तुरी येथील वाहनतळ फुल झाल्याने पोलिसांनी वाहने घाटातील जुमापट्टी येथे ठेवण्याचे सूचित केले. त्यानंतर जुम्मापट्टी येथे पर्यटकांची वाहने उभी करण्यात आली. तेथील वाहनतळदेखील फुल झाल्याने गावाच्या दोन्ही रस्त्यांवर वाहने उभी करून पर्यटक प्रवासी टॅक्सी यांच्या माध्यमातून माथेरान येथे जात आहेत. पर्यटकांच्या गर्दीमुळे माथेरानमध्ये वाहतूक व्यवस्थादेखील कोलमडून गेली.पर्यटक मिनी ट्रेनची वाट पाहत आहेत तर प्रवासी घोडेदेखील पर्यटकांसाठी हाऊसफुल झाल्याने हातरिक्षा यांनादेखील मोठी पसंती दिसून आली. पर्यावरणपुरक ई-रिक्षादेखील पर्यटकांच्या सेवेत असल्याने प्रवाशांना दिलासा मिळताना दिसला.शहरात जागोजागी पर्यटक उभे असल्याचे दिसत आहेत.
पर्यटकांच्या सेवेसाठी हॉटेल्स आणि रेस्टॉरंट यांच्याकडेदेखील पर्यटकांच्या रांगा दिसून आल्या. माथेरान शहरातील सर्वच प्रेक्षणीय पॉईंट येथे पर्यटकांनी गर्दी केली. सुर्यास्त पाहण्यासाठी एको पॉइंट, सनसेट पॉइंट, लुईजा पॉइंट येथे पर्यटक गर्दी करून होते. सकाळचा सूर्य पाहण्यासाठी अलेक्झांडर पॉईंट, खंडाळा पॉईंट आणि पॅनोरमा पॉईंट येथे सकाळी पर्यटक गर्दी करून होते. त्यासाठी पर्यटकांनी घोडे आधीच बुक केले होते असे दिसून आले आहे. प्रेक्षणीय पॉइंट मध्ये सर्वाधिक पर्यटक एको पॉइंट तसेच शारलोट लेक येथे सर्वाधिक पर्यटक दिसून आले.
बकरी ईदसाठी मुस्लिम पर्यटकांची गर्दी… सोमवारी बकरी ईद आली असून त्यासाठी हजारोंच्या संख्येने मुस्लिम धर्मीय पर्यटक माथेरानमध्ये पोहचले आहेत. त्यामुळे माथेरानमध्ये गर्दी वाढली असून बकरी ईदनंतर पुढील चार दिवस मुस्लीम धर्मीय हे आपला सण साजरा करीत असतात. त्यामुळे विकेंड साजरा करण्यासाठी आलेले पर्यटक आणखी काही दिवस माथेरानमध्ये राहणार आहेत. त्यामुळे पर्यटकाांमुळे माथेरानमध्ये विकेंड नाहीतर पूर्ण आठवडा पर्यटकांनी गर्दीचा जाणार आहे. त्यामुळे व्यापार उद्योग वाढणार असल्याने माथेरानमधील व्यवसायिक खुश आहेत.
पर्यटकांच्या सेवेसाठी आमचे अश्व पालक रात्री झोपेत देखील नाही. 24 तास अश्व पर्यटकांच्या सेवेसाठी शहरात उपलब्ध असतात.असेच पर्यटक येत राहिल्यास माथेरान हे पर्यटन स्थळ उच्च पातळीवर येईल.
आशा कदम
अश्वपाल संघटना अध्यक्ष
प्रत्येक विकेंडला वाहनतळ फुल्ल झाल्याचे वन विभाग आणि पालिका यांच्या कडून सांगितले जाते.मात्र आतमध्ये भरपूर जागा उपलब्ध असते.पार्किंग फुल झाल्याने पर्यटकांची गैरसोय होते,त्याचवेळी पर्यटकांच्या तसेच प्रवासी टॅक्सी यांना नेरळ माथेरान घाटात वाहनांना तासनतास थांबून राहावे लागत आहे.पालिकेने वाहनतळ येथील नियोजन सुधारण्याची गरज आहे.
नरेश कराळे
अध्यक्ष
नेरळ माथेरान टॅक्सी संघटना