यश धूलचा विक्रमी धुरळा

दोन्ही डावात शतकी खेळी
। गुवाहाटी । वृत्तसंस्था ।

भारतीय अंडर 19 वर्ल्ड कप विजेत्या संघाचा कर्णधार यश धूल याने रणजी ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. दिल्लीकडून पदार्पणाचा सामना खेळणार्‍या यशने तमिळनाडू संघाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दुसर्‍या डावातही त्याने शतकी खेळी केली. देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठित स्पर्धेतील पदार्पणाच्या सामन्यात दोन्ही डावात शतकी खेळी करणारा तो तिसरा क्रिकेटर ठरला आहे. याआधी नरीमन जमशेदजी नरी कांट्रेक्टर आणि विराट स्वाठे यांनी पदार्पणाच्या सामन्यात दोन्ही डावात शतकी खेळी साकरण्याचा पराक्रमक करुन दाखवला होता.
वेस्ट इंडीजमध्ये झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व केलेल्या यश धूलने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सलामीच्या लढतीत 100 चेंडूत 82 धावांची खेळी केली होती. त्यानंतर कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याला काही सामन्याला मुकावेही लागले. बांगलादेश विरुद्धच्या क्वार्टर फायनल लढतीत त्याने संघात कमबॅक केले. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलमध्ये त्याने शतकी खेळी केली होती. अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने 4 सामन्यात 76.33 च्या सरासरीसह 85.44 च्या स्ट्राइक रेटनं 229 धावा कुटल्या होत्या.
गुवाहटीच्या मैदानात रंगलेला दिल्ली आणि तामिळनाडू यांच्यातील सामना अनिर्णित राहिला. दिल्लीने पहिल्यांदा बॅटिंग करताना पहिल्या डावात 452 धावा केल्या होत्या. मध्यफळीत फलंदाजीला येणारा यश धूलने दिल्लीकडून सलामीला खेळायला आला. या डावात यश धूलने 150 चेंडूत 113 धावांची खेळी केली होती. दुसर्‍या डावात दिल्लीनं बिन बाद 228 धावा केल्या. यावेळी धूल 202 चेंडूचा सामना करुन 113 धावांवर नाबाद राहिला. तामिळनाडूने पहिल्या डावात 494 धावा केल्या होत्या. यात इंद्रजितच्या 117 आणि शाहरुख खानने केलेल्या 194 धावांचा सामावेश होता.

Exit mobile version