पुरुषांमध्ये गावदेवी गोंधळपाडा, महिलांमध्ये पोहरादेवी गोविंदा पथक विजेते
| चौल | प्रतिनिधी |
एक.. दोन.. तीन.. चार.. गोविंदा आला रे… अशा गगनभेदी घोषणांनी तयार झालेला माहोल… एकीकडे पावसाचा जोर, तर दुसरीकडे थरांवर थर धाडसी मानवी मनोरे रचत गोविंदांचा जोश शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटना अलिबाग पुरस्कृत व प्रशांत नाईक मित्रमंडळ आयोजित दहीहंडी स्पर्धेत पाहायला मिळाला. अलिबागच्या या मानाच्या दहीहंडीचा हा उत्साह अन् जल्लोष मध्यरात्रीपर्यंत शिगेला पोहोचला होता. दरम्यान, दोन गोविंदा पथकांनी आठ थरांचे यशस्वी मनोरे रचून नवा विक्रम रचला आहे. या स्पर्धेत 28 पुरुष, तर 24 महिला गोविंदा पथकांनी सहभाग घेतलेल्या स्पर्धेंला पावसाच्या सरींनी खऱ्या अर्थाने आणखी रंगत आणली. दरम्यान, अलिबागची ही मानाची दहीहंडी फोडण्याचा मान पुरुषांमध्ये गावदेवी गोंधळपाडा गोविंदा पथकाने, तर महिलांमध्ये पोहरादेवी शास्त्रीनगर-अलिबागच्या गोपिकांनी पटकाविला. दोन्ही विजेत्या गोविंदा पथकांना मानाची गदा आणि रोख रकमेचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

शेतकरी कामागर पक्ष पुरोगामी युवक संघटना अलिबाग पुरस्कृत व प्रशांत नाईक मित्रमंडळ आयोजित दहीहंडी स्पर्धेत गतवर्षीचे विजेते गावदेवी गोंधळपाडा संघाने सलग दुसऱ्या वर्षीसुद्धा अलिबागची मानाची दहीहंडी सात थर लावून फोडण्याचा विक्रम केला आहे. पहिल्या प्रयत्नांत आठ थरांची सलामी देत उपस्थित प्रेक्षकांना रोमांचित केले. आतापर्यंत सात थरांचा विक्रम या दहीहंडी स्पर्धेत झाला होता.

परंतु, यंदा मरीआई मेटपाडा गोविंदा पथकासह गावदेवी गोंधळपाडा पुरुष गोविंदा पथकांनी आठ थरांचा मनोरा उभारुन नवा विक्रम स्थापित केला आहे. उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्या अन् शिट्टया वाजवून दोन्ही पथकांचे कौतुक केले. दरम्यान, गावदेवी गोंधळपाडा गोविंदा पथकाला 1,31,111 रुपये व मानाची गदा, तर शास्त्रीनगर-अलिबागच्या पोहरादेवी गोविंदा महिला पथकाला 51,111 रुपये व मानाची गदा आणि अलिबाग नगरपरिषद हद्दीतील हे पथक असल्याने स्व. नमिता नाईक यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आलेल्या 50 हजारांचे अतिरिक्त पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

यावेळी अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, शेकापचे जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, द्वारकानाथ नाईक, प्रदीप नाईक, सतीश प्रधान, तालुका चिटणीस सुरेश घरत, अनिल चोपडा, निलम हजारे, कपिल अनुभवणे, आर्य पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले.

या स्पर्धेला सायंकाळी चारनंतर खऱ्या अर्थाने रंगत चढत गेली. एक-एक करुन तब्बल 28 पुरुष आणि 24 महिला गोविंदा पथकांनी येऊन सलामी देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. मागील दोन-तीन महिने रात्रीचा दिवस करुन मेहनत आणि जिद्दीच्या बळावर अलिबाग परिसर आणि तालुक्यातील सहभागी अनेक गोविंदा पथकांनी चार, पाच, सहा, सात थरांचे मानवी मनोरे उभारुन सलामी दिली. हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत एक वेगळा जल्लोष, गोविंदा पथकांचा थरार या सलामीच्या माध्यमातून पहावयास मिळाला. प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात, शिट्ट्या वाजवत सर्वच पथकांच्या सलामीला दाद दिली.

परंपरेला एक नवी उंची
मरीआई मेटपाडा गोविंदा पथक आणि गावदेवी गोंधळपाडा गोविंदा पथकांनी अलिबागच्या मानाच्या दहीहंडी स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच आठ थर रचल्याने स्पर्धेच्या परंपरेला एक नवी उंची मिळाली आहे. मेटपाडा गोविंदा पथकाने आठ थर यशस्वीपणे उभारले. या कामगिरीनंतर पथकाचे सर्वत्र कौतुक होत असून, अलिबागकरांसाठी ही दहीहंडी 2025ची अविस्मरणीय आठवण ठरली आहे. कारण, एकाच स्पर्धेत दोन-दोन गोविंदा पथकांनी आठ थरांची सलामी दिली.

..अन् आसमंत दुमदुमला
खेळ म्हटले की, नवे-नवे इतिहास रचले जातात. हा क्षण सुवर्णाक्षरात कोरण्यासाठी गोविंदांना आवश्यक असणारा पाठिंबा प्रशांत नाईक यांच्या काटेकोर नियोजन आणि मार्गदर्शनाखाली मित्रमंडळाने दिला. यामुळेच गोविंदांनी निडरपणे आपला पराक्रम सादर केल्याचे यावेळी सहभागी गोविंदा पथकांनी सांगितले. अलिबागमध्ये आठ थरांच्या विक्रमाला गोविंदा पथके गवसणी घालत असताना हजारो प्रेक्षकांनी तो थरार अनुभवला. थरावर थर रचत असताना प्रेक्षकांनी रोखून धरलेला श्वास आणि हंडी फोडताच जल्लोषाच्या आरोळ्यांनी सारा आसमंत दुमदुमून गेला होता. यावेळी उत्सवाचा मानबिंदू म्हणून गौरविण्यात आलेल्या प्रशांत नाईक यांना उत्कृष्ट आयोजन, नीटनेटक्या नियोजनाबद्दल सर्वांनी धन्यवाद दिले.

मान्यवरांची स्पर्धेला भेट
या दहीहंडी उत्सवावा अनेक वर्षांची परंपरा आहे. हा सोहळा दरवर्षी जल्लोषात साजरा केला जातो. यंदाच्या या उत्सावाला शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र म्हात्रे, युवासेना जिल्हाध्यक्ष अमिर उर्फ पिंट्या ठाकूर यांच्यासह प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांनी भेट देऊन प्रशांत नाईक आणि मित्रमंडळाला शुभेच्छा दिल्या.

नियोजनासाठी 16 पथके
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रशांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली दोनशेहून अधिक सभासदांनी वेगवेगळी जबाबदारी चोखपणे सांभाळली. त्यासाठी जवळपास 16 विविध पथके तयार करण्यात आली होती. या सभासदांनी प्रथमोपचारापासून दिलेली वेगवेगळी जबाबदारी उत्तमपणे सांभाळून स्पर्धा यशस्वी करण्यात मोलाचा वाटा उचलला. यामध्ये महिला स्वयंसेवकांचेही एक वेगळे पथक याठिकाणी तैनात होते. शेकापच्या महिला व पुरुष कार्यकर्त्यांचाही मोठा सहभाग यामध्ये होता.

सलामी देणाऱ्यांचा सन्मान
महिला गोविंदा पथकाने चार थरांची सलामी दिल्यास पाच हजार रुपये व पाच थरांची सलामी देणाऱ्या गोविंदा पथकाला अकरा हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आले होते. यामध्ये 13 महिला गोविंदा पथकांनी चार थरांचे मनोरे उभारून सलामी दिली असून, अकरा गोविंदा पथकांनी पाच थरांचे मानवी मनोरे उभारून सलामी दिली.
पुरुष गोविंदा पथकाने पाच थरांची सलामी दिल्यास पाच हजार रुपये व सहा थरांची सलामी दिल्यास अकरा हजारांचे बक्षीस होते. 20 गोविंदा पथकांनी सहा थरांची, तर सात गोविंदा पथकांनी सहा थर लावून सलामी दिली. या गोविंदा पथकांना बक्षिसं देऊन गौरविण्यात आले.

लाखभरांनी घेतला घरबसल्या आनंद
ज्यांना कार्यक्रमस्थळी येऊन स्पर्धेत प्रत्यक्ष सहभागी होणे शक्य नव्हते. त्यांच्यासाठी खास या स्पर्धेचे प्रो लिंकच्या या यूट्यू लाईव्हच्या माध्यमातून प्रक्षेपण करण्यात आले. त्यामुळे सव्वा लाखांहून अधिक प्रेक्षकांनी या उत्सवाचा थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून आनंद लुटला. या स्पर्धेत 36 रिल्स स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे.

भाई जयंत पाटील यांच्याकडून शुभेच्छा
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील आणि रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सुप्रिया पाटील यांनी या स्पर्धेला सदिच्छा भेट देऊन स्पर्धकांचा उत्साह वाढवून त्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, प्रशांत नाईक आणि मित्रमंडळाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जयंत पाटील यांनी या स्पर्धेने खऱ्या अर्थाने परंपरा जपल्याचे सांगत प्रशांत नाईक व संपूर्ण टीमचे कौतुक केले.







