पनवेल तालुका सहकारी भात गिरणीची विक्रमी खरेदी

। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल तालुका सहकारी भात गिरणीच्या वतीने सन 2020-2021 च्या हंगामात विक्रमी खरेदी करण्यात आली आहे. भात खरेदीच्या बाबतीत पनवेलचे केंद्र रायगड जिल्ह्यातील सर्वात अव्वल केंद्र ठरले आहे. तर तालुकास्तरावर पेण तालुका अव्वल ठरला आहे.

सर्वच्या सर्व शेतकर्‍यांना हमीभावाची रक्कम थेट खात्यावर जमा झाली असली तरीसुद्धा बोनसची प्रतीक्षा अद्यापही संपलेली नाही.याबाबत पनवेल तालुका सहकारी भात गिरणीचे चेअरमन मनोहर पाटील यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले की, 2020-2021 च्या हंगामात विक्रमी खरेदी करण्यात आली असून सर्वच्या सर्व शेतकर्‍यांना हमीभावाची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. यंदाच्या हंगामात एकूण 21,686 क्विंटल खरेदी झाली असून 1448 शेतकर्‍यांना त्याचे पैसे अदा केले आहेत. या हंगामासाठी शासनाच्या वतीने 1867 रूपये प्रती क्विंटल भाव दिला आहे. असे असले तरी देखील प्रतिक्विंटल 700 रुपये देण्यात येणारा बोनस अद्यापही शेतकर्‍यांना मिळालेला नाही. पुढच्या हंगामाची पेरणी संपत आली असून आता लावण्यांना सुरुवात झाली आहे तरीदेखील बोनसचे पैसे न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

मनोहर पाटील यांनी सांगितले की, विक्रमी स्वरूपाची भात खरेदी झाल्यानंतर गोदाम कमी पडू लागले. त्यामुळे सहकारी भात गिरणीच्या प्रांगणात भाताच्या गोणी रचून ठेवल्या होत्या. परंतु मागील हंगामात दोन वेळा जोरदार स्वरूपाच्या अवेळी पावसाने आमच्यासमोर आव्हान उभे ठाकले होते. पनवेल तालुका सहकारी भात गिरणीचे तमाम संचालक आणि कर्मचारी वृंद यांच्या अथक परिश्रमामुळे वेळीच रचलेल्या भात पोत्यांना ताडपत्रीचे आवरण टाकल्यामुळे किलोभर भात देखील सडू दिले नाही.

एकीकडे हमी भावामुळे शेतकरी पुन्हा एकदा शेती व्यवसायाकडे वळत असताना शासनाने अशा प्रकारे बोनस देण्यात उशीर करणे उचित होणार नाही. शासकीय हमीभाव योजना तळागाळापर्यंत राबविली गेली असली तरी देखील तिचा लाभ जोपर्यंत शेतकर्‍यांना मिळत नाही, तोपर्यंत शेतकर्‍यांचा शासनाप्रती विश्‍वास निर्माण होणार नाही. त्यामुळे शासनाला अशी विनंती असेल की, शेतकर्‍यांचे बोनसचे पैसे तातडीने त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावेत.

– मनोहर पाटील, चेअरमन, पनवेल तालुका सहकारी भात गिरणी

Exit mobile version