तळा नगरपंचायतीकडून नागरिकांची घरपट्टी व पाणीपट्टी वसुली

। तळा । वार्ताहर ।
तळा नगरपंचायतीच्या कर्मचार्‍यांनी तळा शहरातील नागरिकांची घरपट्टी व पाणीपट्टी वसुली करण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी आपली घरपट्टी व पाणी पट्टी जमा करावी यासाठी नगरपंचायतीच्या कर्मचार्‍यांकडून माईकद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. तसेच नगरपंचायतीचे कर्मचारी नागरिकांच्या घरोघरी फिरताना देखील दिसत आहेत.
ज्या नागरिकांनी आपली रखडलेली घरपट्टी, पाणीपट्टी वेळेत जमा केलेली नाही अशा नागरिकांची नावे बाजारपेठेत फलकावर झलकविण्यात येत आहेत.त्यामुळे नागरिक देखील आपलं नाव भर बाजारपेठेत फलकावर येऊ नये यासाठी आपली घरपट्टी व पाणी पट्टी भरताना पहायला मिळत आहेत.तळा नगरपंचायतीमध्ये एकूण घरपट्टी 46 लाख एवढी आहे.त्यापैकी 30 लाख 50,000 घरपट्टी वसूल करण्यात आली आहे तर 15 लाख 50,000 रुपये घरपट्टी अजूनही येणे बाकी आहे. तसेच तळा शहराची एकूण पाणीपट्टी 35 लाख रुपये आहे.त्यापैकी 21 लाख 75 हजार रुपये पाणीपट्टी वसूल करण्यात आली आहे तर 13 लाख 25 हजार रुपये पाणीपट्टी अद्यापही येणे बाकी आहे.त्यामुळे नागरिकांनी आपली घरपट्टी व पाणीपट्टी लवकरात लवकर जमा करून सहकार्य करण्याचे आवाहन नगरपंचायत प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version