शिक्षक भरती रिक्तपदाचे ग्रहण सुटले !

जिल्ह्यात 800 गुरुजींचा मार्ग मोकळा


| रायगड | खास प्रतिनिधी |

राज्यात पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे. तर, दुसऱ्या टप्प्यात जवळपास 20 हजार शिक्षकांची भरती केली जाणार अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली होती. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्यात सध्या 1 हजार 100 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यापैकी 80 टक्के म्हणजे सुमारे 800 शिक्षकांची भरती होणार असल्याने शिक्षकांच्या रिक्तपदाचे ग्रहण आता सुटणार आहे.

रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कानाकोपऱ्यात शिक्षणाचे जाळे जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातून विणले आहे. त्यामुळे सर्वसामन्यांना शिक्षण घेता येणे शक्य झाले आहे. जिल्ह्यामध्ये पहिले ते आठवीच्या तब्बल दोन हजार 442 शाळा आहेत. त्यामध्ये सुमारे 90 हजारोंच्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यासाठी सात हजार 200 शिक्षकांची पदे मंजूर आहेत. मात्र विविध कारणांनी सुमारे एक हजार 100 पदे रिक्त झाली आहेत. सरकारच्या धोरणानुसार शिक्षक भरतीला ब्रेक लागला होता. त्यामुळे कमी मनुष्यबळाच्या जोरावर शिक्षणाचा गाडा शिक्षण विभागाला ओढावा लागत होता. बऱ्याच आधीपासून यामध्ये सकारात्मक काही घडत नसल्याने उपलब्ध शिक्षकांच्या जीवारच विद्यार्थ्यांना शिकवावे लागत होते. रायगड जिल्ह्यात एक हजार 100 पदे रिक्त आहेत. पैकी 80 टक्के म्हणजे सुमारे 800 शिक्षकांची भरली जाणार आहेत. त्याबाबतचा अंतिम अहवाल तयार करण्याचे काम शिक्षण विभागामध्ये सुरु आहे.

अपुरे मनुष्यबळ असल्याने संबंधीत शिक्षकांवर कामाचा ताण येत होता. तसेच एमएड, बीएड शिक्षण घेऊन बरेच बेराजगार हे शिक्षक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून होते. शिक्षक भरती करण्याबाबत सातत्याने मागणी वाढत होती. दबाव वाढल्याने अखेर शिक्षक भरती करण्यात येते असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केले. पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे, तसेच आधार वेरिफिकेशन विद्यार्थ्यांचे पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती संदर्भात आकडा कळेल, असेही त्यांनी त्यांनी म्हटले आहे. शंभर टक्के शिक्षक भरती होणार आहे. त्यासाठी संच मान्यता झाली पाहिजे. कारण आरक्षणानुसार ही पद भरती होईल. या उमेदवारांच्या मुलाखती होऊन त्यांची भरती केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

Exit mobile version