मोदींची शक्ती कमी करणे देशाची गरज

| सातारा | प्रतिनिधी |

सातारा जिल्ह्यात यशवंतराव चव्हाणांपासून अनेक कर्तृत्त्वान लोकांची फळी निर्माण झाली आहे. त्यांच्या विचारांचा पगडा आजही लोकांच्या मनावर आहे. हजारोंच्या संख्येने शशिकांत शिंदेंचा अर्ज भरण्यासाठी आले. देशातील लोकांना परिवर्तन हवं आहे. त्याचे पहिले पाऊल सातार्‍यातून टाकले आहे. आमच्या लोकांचा आत्मविश्‍वास वाढवण्याचे काम सातारकरांनी केले. सध्या मोदींची शक्ती कमी करणे देशाची गरज आहे असे विधान शरद पवारांनी केले. सातारा येथे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी पवार म्हणाले की, विरोधकांकडे सांगण्यासारखे दुसरे काही नाही. शशिकांत शिंदेंना लोकांचा प्रतिसाद मिळतोय हे पाहून त्यांच्यावर आरोप लावले जात आहेत. आपले नाणं खणखणीत आहे. लोकांमध्ये शशिकांत शिंदे यांच्याबद्दल आपुलकी आहे. पुरोगामी विचारांना सातारची जनता नेहमीच पाठिंबा देतात. श्रीनिवास पाटलांनाही सातारकरांनी निवडून दिले. गेल्यावेळी आघाडी नव्हती आता आघाडी आहे. एक एक जागा निवडून आणण्यासाठी इंडिया आघाडी काम करत आहे. मोदींची एक एक जागा कमी करणे, मोदींची संसदेतील संख्या कमी करणे, त्यांची शक्ती कमी करणं ही देशाची गरज आहे असं त्यांनी सांगितले. तसेच देशाची सत्ता मोदींच्या हाती आहे. मागील 10 वर्ष त्यांच्याकडे राज्य आहे आणि हिशोब मला मागतात, मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात मी काय काम केले त्याचे उत्तर देऊ शकतो. इंडिया आघाडीच्या उमेदवारांना समाजातील सर्व घटकांना पाठिंबा आहे. मागील निवडणुकीत विरोधकांना एकूण 6 जागा मिळाल्या होत्या. त्यात आम्हाला 4, काँग्रेसला 1 तर एमआयएमला 1 अशा जागा होत्या. या निवडणुकीत यंदा 60 ते 70 टक्के जागांवर आम्ही विजयी झालो तर आश्‍चर्य वाटणार नाही. विशेषत: विदर्भात काँग्रेसला यश मिळेल. निवडणुकीतील बाबत काहींनी चिंता व्यक्त केली. अनेकांनी त्यावर प्रश्‍नचिन्ह उभे केलेत. त्यामुळे शंकेला जागा आहे असं दिसतं असंही शरद पवारांनी म्हटलं.

Exit mobile version