अल्पदरात उपलब्ध होत असल्याने गोरगरिबांना मदत
| पनवेल | दीपक घरत |
पालिकेच्या माध्यमातून पालिका हद्दीतील नागरिकांसाठी शववाहिन्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये शीतपेट्या असलेल्या दोन शववाहिन्यांचादेखील समावेश आहे. शीतपेट्या उपलब्ध असलेल्या या शववाहिन्यांमुळे पालिका हद्दीत मृत्यू झालेल्या मात्र मृतकाची आपल्या मूळ गावी अंत्यविधी करण्याची इच्छा असलेल्या नातेवाईकांची मोठी सोय झाली असून, पालिकेच्या या शववाहिन्या मृतकाच्या नातेवाईकांसाठी मोठा आधार ठरत आहेत.
परजिल्ह्यातून कामानिमित्त पनवेल, नवी मुंबई परिसरात वास्तव्याला आलेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. पालिकेच्या स्थापनेनंतर पनवेल पालिका हद्दीत राहायला येणाऱ्या कुटुंबाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. अनेकदा अशा कुटुंबातील व्यक्तीचा दुर्दैवाने मृत्यू होण्याच्या घटना घडत असतात. अशावेळी मृत्यू झालेल्या व्यक्तीचे शव आपल्या मूळ गावी पोहोचविण्यासाठी लागणाऱ्या वेळेमुळे मृतदेह खराब होण्याची शक्यता असल्याने वातानुकूलित खासगी शववाहिनी किंवा ॲम्ब्युलन्सचा वापर केला जात होता. यासाठी खासगी शववाहिनी चालकांकडून आवाच्या सव्वा भाडे आकारले जात असल्याने मृत्यू झालेल्या व्यक्तीचे पार्थिव दूरवर देण्यासाठी नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. पालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या शीतपेट्याची सोय असलेल्या शववाहिनीच्या सुविधेमुळे मृतांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळत आहे.
पालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या शीतपेटी असलेल्या शवदाहिन्या मृत पार्थिव पोहोचविण्याचे अंतराचा हिशोबाने 10 रुपये किलोमीटर या दराने सुविधा पुरवत आहेत. या वाहनांवर पालिका प्रशासनाकडून चालक उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. यामुळे दूर अंतरावरही कमी खर्चात पार्थिव पोहोचवणे सोप्पं झालं आहे.
खासगी शववाहिन्याच्या मनमानीवर चाप
पालिकेच्या शववाहिन्यांमुळे मनमानी पद्धतीने भाडे आकरणाऱ्या खासगी शववाहिन्या चालकांच्या मनमानीवर मोठ्या प्रमाणात चाप बसला आहे.
शववाहिनीसाठी पालिकेचा हेल्पलाईन क्रमांक
दुःखद काळात शववाहिनीची गरज लागल्यास तात्काळ मदतीसाठी पालिकेच्या माध्यमातून 022-2745 8040/41/42 हे हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच पालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांनादेखील याकरिता संपर्क साधता येणार असून, वैद्यकीय विभागाचे अधिकारी डॉ. भक्तराज भोईटे यांच्याशी 9766001696 क्रमांकावर संपर्क साधवा.
चार प्रभागात पाच शववाहिन्या
पालिकेतर्फे कोव्हीड काळात एक शववहिनी खरेदी करण्यात आली होती. त्यानंतर 2023 साली नव्याने चार शववाहिन्या खरेदी करण्यात आल्याने पालिकेकडील शववाहिन्यांची संख्या पाच झाली असून, खारघर वसाहत 1, नावडे वसाहतीत 1, कळंबोली 1, कामोठे 1 आणि पनवेल 1 अशा पाच ठिकाणी शववाहिन्या उपलब्ध आहेत. ज्यामध्ये दोन शववाहिन्यांमध्ये शीतपेट्यांची सुविधा उपलब्ध आहे.
शववाहिनी
पालिकेमार्फत सुरु करण्यात आलेल्या शववाहिन्यांनकडून 9 ऑगस्टपर्यंत पालिका हद्दीबाहेर 198 ठिकाणी सेवा देण्यात आली आहे. तर पालिका हद्दीत 109 नागरिकांना या सेवेतून मदत देण्यात आली आहे. या आकडेवारीत नावडे विभागाची आकडेवारी समाविष्ठ नाही. तर प्रभाग समिती- 'अ' खारघर शववाहिका अहवालानुसार दि. 01/12/2024 ते दि. 31/08/2025 पालिका क्षेत्रातील- 31, पालिका क्षेत्राबाहेर - 12 सेवा देण्यात आली आहे.
जिल्ह्याबाहेरील व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या मूळ गावी शव नेण्यासाठी मोठी कसरत नातेवाईकांना करावी लागत होती. पालिकेच्या शीतपेटी असलेल्या शववाहिन्यांमुळे नातेवाईकांची होणारी गैरसोय काही प्रमाणात दूर झाली आहे.
– अशोक मोटे, मा. जिल्हा चिटणीस, उत्तर रायगड भाजपा







