| पुणे | प्रतिनिधी |
राज्यभरातील टेनिस बॉल क्रिकेटपटूंना आपले कौशल्य दाखवण्याची आणि तब्बल एक कोटींहून अधिक रुपयांची बक्षीसे जिंकण्याची सुवर्णसंधी आता उपलब्ध होणार आहे. सकाळ माध्यम समूहातर्फे जगातील सर्वात मोठ्या टेनिस बॉल बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ही स्पर्धा होणार असून, स्पर्धेच्या नोंदणीला प्रारंभ झाला आहे.
व्यावसायिक क्रिकेटप्रमाणेच टेनिस बॉल बॉक्स क्रिकेट हे देशात लोकप्रिय असून, शहरांमध्ये विविध ठिकाणी नियमितपणे बॉक्स क्रिकेट खेळले जाते. येथे गुणवान खेळाडूंची जणू खाणच आहे. अशाच खेळाडूंचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘सकाळ’ने या भव्य स्पर्धेचे आयोजन केले आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, ठाणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, गोवा या शहरांमध्ये ही स्पर्धा होणार असून, 12 वर्षे वया पुढील खेळाडू या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. फ्रँचायझी पद्धतीने होणारी ही स्पर्धा असून, फ्रँचायझी व खेळाडूंसह किंवा केवळ फ्रँचायझी खरेदी करून अथवा केवळ खेळाडू म्हणूनही या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. स्पर्धेत विजेतेपद मिळवणाऱ्या संघाला तब्बल एक कोटी रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. तसेच, अन्य सांघिक आणि वैयक्तिक क्रमांकानाही रोख रकमेची बक्षीसे दिली जाणार आहेत.
भारतात ‘क्रिकेट’ या खेळाची लोकप्रियता मोठी आणि क्रिकेटच्या चाहत्यांसह क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंचीही संख्या तितकीच मोठी. त्यामुळेच व्यावसायिक क्रिकेट इतकेच टेनिस बॉल बॉक्स क्रिकेट, हे देखील आता स्वतंत्र क्रीडाप्रकार म्हणून पाहिले जाते. ‘सकाळ’तर्फे आयोजित टेनिस बॉल बॉक्स क्रिकेट स्पर्धेतून या प्रकारातील गुणवान क्रिकेटपटूंना योग्य व्यासपीठावर संधी मिळणार आहे.






