निजामपूर आरोग्य केंद्राचा ‌‘कायाकल्प’

रायगडाच्या यशात मानाचा तुरा

| माणगाव | प्रतिनिधी |

शासनाच्यावतीने नुकतीच ‌‘कायाकल्प’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात रायगड जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने वेगळी छाप उमटवत ‌‘कायाकल्प’ योजनेत भरारी घेतली आहे. जिल्ह्यातील 15 प्राथमिक आरोग्य केंद्रे व 29 आरोग्यवर्धिनी उपकेंद्रे अशा सुमारे 44 शासकीय आरोग्य संस्थांना कायाकल्प पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच, जिल्हास्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार माणगाव तालुक्यातील निजामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला आहे. त्यामुळे माणगाव तालुक्यासह रायगड जिल्ह्यातून निजामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशीम भारसाखळे यांचे अभिनंदन होत आहे.

आरोग्य सेवा सुधारणेच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या ‌‘कायाकल्प’ उपक्रमांतर्गत रायगड जिल्ह्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सन 2024-25 मध्ये रायगड जिल्ह्यातील एकूण 15 प्राथमिक आरोग्य केंद्रांना व 29 उपकेंद्रांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे. ही बाब जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेच्या कार्यक्षमतेचे व जनतेच्या आरोग्यावरील सकारात्मक परिणामाचे प्रतीक मानली जात आहे. रायगड जिल्ह्यात निजामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राने सर्वोत्तम कामगिरी बजावत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक व दोन लाख रुपयांचे बक्षीस पटकावले आहे. या आरोग्य केंद्राच्या व्यवस्थापन, स्वच्छता, रुग्ण सेवा, डॉक्युमेंटेशन आणि समाज सहभाग या सर्वच निकषांवर केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची ही पावती आहे. याशिवाय इतर 14 प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले असून, यामध्ये विविध तालुक्यांतील कार्यक्षम केंद्रांचा समावेश आहे. त्यांनी आरोग्य सुविधा, वैद्यकीय सुविधा उपलब्धता, स्वच्छता व रुग्ण संतुष्टि यामध्ये उल्लेखनीय सुधारणा केली आहे. त्याचबरोबर 29 उपकेंद्रांनी देखील कायाकल्प उपक्रमात स्वतःचे स्थान निर्माण केले असून, स्थानिक स्तरावर आरोग्य सेवा पोहचवताना त्यांनी निकोप व स्वच्छ वातावरण निर्माण केले आहे.

या उपकेंद्रांची निवड ही त्यांच्या अंमलबजावणीतील पारदर्शकता, नियमित तपासण्या, रुग्ण अभिप्राय, तसेच सेवाभावाच्या मूल्यमापनावर आधारित करण्यात आली आहे. ही संपूर्ण कामगिरी रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या समन्वयाने, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीने व कर्मचारी वर्गाच्या योगदानाने शक्य झाली आहे. कायाकल्प उपक्रमात मिळालेले हे यश जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला नवा आत्मविश्वास देणारे ठरले आहे. त्याकरिता रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा विखे, कल्याण-डोंबिवली शहर कार्यक्रम व्यवस्थापक संदीप राऊत, माणगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दीपाली पुरी, निजामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशिम भारसाखळे तसेच रायगड जिल्ह्यामधील सर्व प्राथमिक आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले.

Exit mobile version