चक्क मृत आत्याला केले जिवंत; बनावट महिलेच्या नावाने हक्कसोड पत्र
| उरण | प्रतिनिधी |
उरण व पनवेल तालुक्यात जमिनींना सोन्याचे भाव आले आहेत. त्यामुळे या ठिकाणी पैशाच्या हव्यास्यापोटी, स्वार्थासाठी जमीन बेकायदेशीर पणे विकण्याचे धंदे जोरात सुरु आहेत. उरण मध्येही असाच प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सिडकोच्या संपादित जमिनीच्या मोबदल्यात मिळणारा कोट्यवधीचा भूखंड हडपण्यासाठी नातेवाईकांनीच चक्क मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यासाठी 12 वर्षांपूर्वी मयत झालेल्या आपल्या आत्याला कागदोपत्री जिवंत करून हक्कसोड पत्र बनविण्यात आले. त्यामुळे उरणमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
चिर्ले येथील सुभाष नामदेव घरत (56) यांची आई लहानुबाई उर्फ बानुबाई यांचे 1 मार्च, 2013 रोजी निधन झाले होते. सर्व नातेवाईक त्यांच्या अंत्यविधीला हजर होते. आजोबा रामा गमा मढवी यांच्या नावे चिर्ले येथे असलेल्या जमिनीवर डोळा ठेवून नातेवाईकांनीच कट रचला. ऑक्टोबर 2024 मध्ये कृष्णा गजानन मढवी, मयूर तुकाराम मढवी आणि बाबू उर्फ बाबुराव रामा मढवी यांनी सुभाष घरत यांची आई मयत झाली आहे, हे माहिती असतानाही केवळ नावातील साम्याचा फायदा घेत पनवेल तालुक्यातील डेरवली येथील एका महिलेला रजिस्टर ऑफिसमध्ये लहानुबाई म्हणून उभे केले. तसेच, या महिलेचे फोटो, सही आणि अंगठा वापरुन विनामोबदला हक्कसोडपत्र पदरात पाडून घेतले. विशेष म्हणजे या बनावट हक्कसोडपत्राच्या आधारे त्यांनी 18 मार्च रोजी बांधकाम व्यावसायिक पार्थ गजोरा याच्या नावे जमिनीचे खरेदीखतही करुन घेतले. मूळ वारसदार सुभाष घरत यांना व इतर वारसदारांना कोणतीही कल्पना न देता हा सर्व व्यवहार पूर्ण करण्यात आला. दरम्यानच्या काळात सुभाष घरत यांनी तलाठी कार्यालयात वारसदार असलेल्या आपल्या आईची माहिती घेतल्यानंतर तिच्या नावाने हक्कसोडपत्र घेण्यात आल्याचे आढळुन आले. त्यानंतर त्यांनी अधिक माहिती घेतली असता बनावट महिलेच्या माध्यमातून हा सर्व प्रकार केल्याचे उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी कृष्णा मढवी, मयूर मढवी, बाबुराव मढवी आणि संबंधित भुखंड खरेदी करणरा पार्थ गजोरा या चार जणांविरोधात फसवणूकीसह बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
