| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांकडून दररोज एक तास अतिरिक्त काम करून घेतले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, कायमच्या सफाई कामगारांप्रमाणेच कंत्राटी सफाई कामगारांनाही दुपारी दीड वाजता कामावरून मुक्त करावे, अशी मागणी आझाद कामगार संघटनेने केली आहे.
महानगरपालिकेतील कायम असलेले सफाई कामगारांना निर्धारित वेळेनंतर कामावरून मुक्त केले जाते. मात्र, त्याच स्वरूपाचे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांकडून अतिरिक्त वेळ काम करून घेतला जात असल्याने कामगारांमध्ये नाराजी असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. समान स्वरूपाचे काम करणाऱ्या कामगारांच्या कामाच्या वेळेत भेदभाव करू नये, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. या प्रकरणी आझाद कामगार संघटनेने यापूर्वीही पनवेल महानगरपालिका प्रशासन तसेच संबंधित कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदने दिली आहेत. मात्र, अद्याप कंत्राटी कामगारांच्या कामाच्या वेळेबाबत ठोस निर्णय झालेला नसल्याचा दावा संघटनेने केला आहे. दररोज अतिरिक्त एक तास काम करून घेतले जात असल्यास, त्याचा नियमानुसार मोबदला किंवा अतिरिक्त कामाचे वेतन देण्यात यावे, अशी मागणीही संघटनेने केली आहे. तसेच ,आतापर्यंत केलेल्या अतिरिक्त कामाचा योग्य मोबदला देण्याची मागणी करण्यात आली आहे.
‘कंत्राटी कामगारांना दुपारी मुक्त करा’
