राजीव गांधी यांच्या मारेकर्‍यांची सुटका

सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषी नलिनी श्रीहरन आणि आरपी रविचंद्रन यांच्यासह सहाजणांची सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सुटका करण्यात आलेली दोषी महिला नलिनी सध्या पॅरोलवर कारागृहाच्या बाहेर आहे. याआधी मद्रास उच्च न्यायालयाने दोषी नलिनीची सुटकेची मागणी करणारी याचिका फेटाळली होती. त्यानंतर नलिनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

याआधी राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषी एजी पेरारिवालन याची 18 मे रोजी सुटका करण्यात होती. पेरारिवालन याने राजीव गांधींच्या हत्याप्रकरणात 30 वर्षे शिक्षा भोगलेली आहे. त्याने संविधानातील कलम 142 चा आधार घेत आपल्या सुटकेची मागणी केली होती. दोषी नलिनीने पेरारिवालनच्या बाबतीत घेण्यात आलेल्या याच निर्णयाचा दाखला देत माझीही सुटका करावी, अशी मागणी केली होती.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्या.आर.एस.गवई आणि न्या. बी.व्ही नागरत्न यांच्या खंडपीठाने राजीव गांधी हत्याकांडातील दोषी नलिनी श्रीहर, रॉबर्ट पायस, रविचंद्रन, सुतेंत्र राजा संतान, श्रीहरन मुरुगन आणि जयकुमार यांची तुरुंगातून सुटका करण्याचे आदेश दिले. या आरोपींची अन्य कोणत्याही प्रलंबित गुन्ह्यात कस्टडी नको असेल तर त्यांची तुरुंगातून सुटका करावी, असे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले.
सर्वोच्च न्यायालयाने आणखी एक दोषी पेरारीवलन यांची यापूर्वी 17 मे रोजी सुटका करण्याचे आदेश जारी केले होते. त्याच युक्तीवादाचा आधार घेत आज सर्वोच्च न्यायालयाने या हत्याकांडातील अन्य सहा दोषींची सुटका करण्याचे आदेश दिले. हे सर्व दोषी गेल्या 30 वर्षांहून जास्त काळ मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.

Exit mobile version