रिलायन्स ठेकेदारी हाणामारी प्रकरण! आरोपींना 26 मे पर्यंत पोलीस कोठडी

दोघांवर पेण व अलिबाग येथे उपचार

। नागोठणे । प्रतिनिधी ।

नागोठण्याजवळील रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीत कामगार पुरविणे, तसेच ठेकेदारी पद्धतीने कामे करणे यावरून नागोठणे पोलीस ठाणे हद्दीतील शिहू-मुंढाणी (ता.पेण) परिसरात राहणाऱ्या दोन गटात वाद निर्माण होत हाणामारी झाली होती. या हाणामारीत तलवारीचे वार करण्यात आले होते. ही घटना सोमवारी (दि.20) रात्री 11.45 वाजण्याच्या सुमारास मुंढाणी फाटा येथे घडली होती. नागोठणे पोलिसांकडून याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आठही आरोपींना मंगळवारी पेण येथील प्रथम वर्ग फौजदारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने आठही आरोपींना 26 मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

या घटनेतील परस्परविरोधी तक्रारीतील फिर्यादी व आरोपींचे रिलायन्स कंपनीत कामगार पुरविणे यावरून वाद निर्माण झाले होते. हा वाद इतका विकोपाला गेला की, त्याचे रुपांतर तुंबळ हाणामारीत झाले. यावेळी या हाणामारीत संकेत उर्फ संकेश शैलेश चोरगे (बेणसे-पेण) याच्या मानेवर तलवारीने वार केल्याने तो गंभीररित्या जखमी झाला. त्याला पेण येथील डॉ. म्हात्रे यांच्या खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तर, दिपक कमलाकर घासे (मुंढाणी- पेण) याच्याही हाताला गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने फ्रॅक्चर झाले असून त्याला अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच, या तुंबळ हाणामारीत इतरही काही जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.

रिलायन्स कंपनीत असणारे ठेकेदार यांचे बाहेर आपापसांत काय वाद आहेत याच्याशी कंपनीचा काहीही संबंध नाही. त्या दोन गटांची झालेली भांडणे ही त्यांच्यात काही इतर कारणावरून पण असू शकतात. त्यामुळे शिहू फाट्यावर झालेल्या या दोन गटातील भांडणाचा रिलायन्स कंपनीशी काहीही संबंध नाही.

श्री. रमेश धनावडे, जनसंपर्क अधिकारी,
रिलायन्स इंडस्ट्रीज लि., नागोठणे
Exit mobile version