रियालयन्सचा मनमानी कारभार

मागण्या पूर्ण न करताच कंपाऊंडचे काम सुरू

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे कंपनीच्या संलग्न बेणसे झोतिरपाडा ग्रामपंचायत हद्दीत नवीन प्रकल्पाची उभारणी होत आहे. रिलायन्सचा नवा प्रकल्प उभारत असताना येथील स्थानिक, भूमीपुत्र, शेतकरी, पशुपालक, मत्स्यव्यावसायिक यांच्या मागण्यांची आणि तक्रारींची रिलायन्स व्यवस्थापनाकडून लेखी स्वरूपात दखल व पूर्तता होणार असल्याची विश्वासार्ह हमी आजवर दिली गेलेली नाही. तर, आंदोलनातील एकही मागणी मान्य न करताच कामे वेगाने पूर्ण करण्याचा सपाटा सुरू असल्याने येथील स्थानिक जनतेत असंतोष उफाळून आला आहे. शेतकरी व स्थानिकांनी शुक्रवरी (दि. 12) कंपाऊंडचे काम सुरू असल्याच्या ठिकाणी जाऊन जाब विचारला. आमच्या मागण्या आधी पूर्ण करा, अशी जोरदार मागणी केली.

नव्याने प्रकल्प उभारत असताना हा प्रकल्प नेमका कोणता आहे? मानवी व सजीव सृष्टीस किती अपायकारक व घातक आहे, लाखो वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे, यावर पर्यावरणाचा समतोल राखणारी कोणती व्यवस्था केली आहे? याची माहिती कोणतीही जनसुनावणी घेऊन देण्यात आलेली नाही. येथील जनतेला शेतकऱ्यांना विश्वासात न घेता, स्थानिकांच्या मूलभूत प्रश्न तक्रारी व समस्यांची सोडवणूक न करता प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. अशातच या नव्या प्रकल्प निर्मितीत साधारणतः 40 ते 50 फूट मातीचा भराव करण्यात आला आहे. हे मातीचे ढिगारे कोसळून येथील पशुधन नष्ट होत असल्याने शेतकरी पशुपालक चिंतेत सापडले आहेत. तर, पावसाळ्यात या अवाढव्य मातीच्या भरावाने महापुराची स्थिती ओढवून सभोवतालच्या गावात व घरात पुराचे पाणी शिरून जीवितहानी व वित्तहानी होण्याची भीती वाढली आहे. शेतकरी पशुपालक यांना शेतावर जाण्या-येण्याकरिता पूर्वापार वहिवाट व दळणवळणाचे साधन नष्ट करण्याचा डाव रिलायन्स व्यवस्थापनाने आखला असल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे, रविवारी सुट्टीच्या दिवशी तार कपांऊंडचे काम अतिवेगाने केल्याचा संताप पशुपालक आसिफ मोमीन व शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

शेतकरी, पशुपालक व मत्स्यव्यावसायिक यांना व वाहनांना जाण्या-येण्यासाठी आवश्यक तितका रुंद रस्ता ठेवण्यात आला नाही. अरुंद रस्त्यावरून अग्निशमन बंब, रुग्णवाहिका, शेतकऱ्यांची साहित्य ने-आण करणारी वाहने कशी नेणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. बेणसे सिध्दार्थ नगर येथील विविध जनहितार्थ मागण्यांसाठी आमरण उपोषणास बसलेले आंदोलक योगेश अडसुळे यांनी सांगितले की, उपोषणाच्या कोणत्याही मागण्या पूर्ण केल्या गेल्या नाहीत.

उपोषणदरम्यान मागण्यांच्या अनुषंगाने पेण तहसीलदार, पोलीस उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक व रिलायन्सचे अधिकारी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत दिलेले आश्वासन पूर्ण न करताच बेणसे सिध्दार्थ नगर गावाला लागून तारेचे कपांऊंड केले जात आहे, त्यामुळे मी मागण्यांच्या पूर्ततेसाठी पुन्हा आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा योगेश अडसुळे यांनी दिला आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत कपांऊंडचे काम थांबवावे, अशी जोरदार मागणी बेणसे झोतिरपाडा, बेणसे सिध्दार्थ नगर येथील शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान यासंदर्भात रिलायन्स व्यवस्थापनाची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

Exit mobile version