समायोजनाला स्थगिती
| रायगड | प्रतिनिधी |
राज्यातील शाळांतील शिक्षकांच्या समायोजनामुळे अनेक शाळा बंद पडण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, आता शिक्षक समायोजनाला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, शैक्षणिक वर्ष वर्ष 2025-26च्या संचमान्यतेनंतरच समायोजनाची प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे राज्यभरातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी संचमान्यता स्थगितीबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना परिपत्रकाद्वारे निर्देश दिले आहेत. शिक्षक समायोजनाबाबत शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक, केंद्रप्रमुख सभा अशा संघटनांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर 15 मार्च 2025 रोजीच्या संचमान्यतेनुसार राज्यातील शाळांतील अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत सुधारित कार्यपद्धतीचा अवलंब करुन समायोजन प्रक्रिया राबवून उर्वरित रिक्त पदांचा तपशिल, अतिरिक्त कर्मचारी यादी (रिक्त पदांचा प्रवर्ग, विषय, अनुदानाचा, व्यवस्थापन प्रकारासह) संचालनालयास सादर करण्याबाबत 20 नोव्हेंबर रोजीच्या पत्राद्वारे क्षेत्रिय अधिकाऱ्यांस कळवण्यात आले होते. मात्र, 2025-26 च्या ऑनलाइन संच मान्यतेबाबतची संकेतस्थळावरील कार्यवाही अंतिम टप्यात असल्याने, तसेच 2024-25 मधील संचमान्यतेनुसार अतिरिक्त झालेले शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया डिसेंबर, 2025 मध्ये राबवणे, 2025-26 च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया, संचमान्यता प्रसिद्ध झाल्यानंतर पुन्हा करावी लागणार आहे.
पुन्हा पुन्हा समायोजन प्रक्रिया राबवण्याऐवजी सन 2025-26 च्या संचमान्यतेनुसारच समायोजन प्रक्रिया करणे योग्य होणार आहे. त्यामुळे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय स्तरावरून 20 नोव्हेंबर रोजीच्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याच्या पत्राला स्थगिती देण्यात येत आहे. तसेच सन 2025-26 च्या संचमान्यता प्रसिद्ध झाल्यानंतर निश्चित केल्या कार्यपद्धतीनुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात यावे, असे शिक्षण आयुक्तांच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने यांनी संचमान्यतेच्या स्थगितीच्या निर्णयाचे स्वागत केले. 2024-25च्या संचमान्यतेनुसार समायोजन प्रक्रिया राबवल्यास अनेक अडचणी निर्माण होणार असल्याची, विशेषतः नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांची गैरसोय होणार असल्याची, राज्यातील 600पेक्षा अधिक मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडण्याचा धोका असल्याची बाब मुख्याध्यापक महामंडळाने शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक यांच्या निदर्शनास आणून दिली होती. तसेच 2024-25च्या संचमान्यतेनुसार समायोजन करण्यास स्थगिती देऊन 2025-26च्या संचमान्यतेनुसार समायोजन करण्याची मागणी केली होती. त्यानुसार 2025-26च्या संचमान्यतेनुसार समायोजन प्रक्रिया राबवण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. आता मे मध्येच समायोजन प्रक्रिया पूर्ण केल्यास कोणाचीही अडचण होणार नाही, असे माने यांनी सांगितले.







