महसूल प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवले
| वावोशी | वार्ताहर |
खोपोलीतील मुळगाव येथे अनेक वर्षांपासून अनाधिकृत बांधकामांचे अतिक्रमण आणि घाणीच्या ढिगार्याच्या विळख्यात अडकलेल्या शासकीय धान्य गोदामाची अखेर महसूल व पोलीस प्रशासनाकडून सुटका करण्यात आली. शासकीय धान्य गोदामात नव्याने नियुक्त झालेले व्यवस्थापक जयंत दबडे यांनी तात्काळ आपले वरिष्ठ अधिकारी जिल्हा पुरवठा शाखेचे अधिकारी सर्जेराव सोनावणे, खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी यांना पत्रव्यवहार करून अनाधिकृत बांधकामांचे अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली आणि ती यशस्वी करून दाखवली आहे. त्यामुळे सर्व नागरिकांमधून प्रशासनाचे अभिनंदन केले जात आहे.
शासकिय धान्य साठवण्यासाठी खोपोलीमधील मूळगाव येथे बांधण्यात आलेल्या गोदामाच्या बाजूला अनधिकृत खासगी वाहनांची पार्किंग असल्यामुळे गोदामात धान्य खाली करण्यासाठी येणार्या मोठ्या वाहनांना पूरेशी जागा मिळत नसल्याने अडथळा होत होता. धान्य भरलेल्या वाहनांना तासनतास खोळंबून राहावे लागत असायचे. त्यामुळे या ठिकाणी अनधिकृत वाहनांची पार्किंग करणार्या वाहन चालकांना वारंवार सूचना देऊन देखील शासकीय जागेमध्ये शासकीय धान्य गोदामासमोरील वाहन काढत नसल्याने वाहनचालक यांच्यामध्ये वादविवाद होत असत. शिवाय या परिसरात अनाधिकृत झोपड्या, दुकाने, दुर्गंधीयुक्त कचर्याचे ढिगारे, उघड्यावर शौचाला बसणे आणि साचलेल्या दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामुळे या गोदामाची स्थिती अतिशय दयनीय बनली होती.
अनेक वर्षापासून ही परिस्थिती जैसे थे प्रमाणेच होती. परंतू या ठिकाणी नियुक्त झालेले नवीन व्यवस्थापक जयंत दबडे यांनी मात्र सदर परिस्थीतीवर उपाययोजना करण्यात यावी याकरिता आपले वरिष्ठ जिल्हा पुरवठा शाखेचे अधिकारी सर्जेराव सोनावणे, खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी, पुरवठा शाखा अधिकारी विकास पवार व खोपोलीचे पोलीस निरीक्षक शितल राऊत यांना पत्रव्यवहार करून त्यांच्या आदेशाने अतिक्रमण व घाणीच्या विळख्यात अडकलेल्या शासकीय गोदामाची पोलीस बंदोबस्तात सुटका करून घेण्यात आली आहे. यावेळी जेसीबीच्या साहाय्याने गेली 40 ते 50 वर्षापासून या ठिकाणी असणार्या अनधिकृत बांधकामांचे अतिक्रमण हटवण्यात आले आहे. शिवाय अनेक वर्षापासून साचलेल्या दुर्गंधीयुक्त कचर्याची देखील विल्हेवाट लावण्यात आली.
या ठिकाणी अनधिकृत बांधकामांचे जाळे इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की येथील अतिक्रमण हटविण्याची कारवाई अजूनही सुरूच आहे. तसेच खोपोली वाहतूक शाखेचे पोलीस सहायक निरीक्षक मुंडे, हवालदार संजय सताणे यांनी अनाधिकृतपणे वाहन पार्किंग केलेल्या वाहन चालक व मालकांवर देखील दंडात्मक कारवाई करीत हजारो रुपयांचा दंडात्मक निधी शासनास जमा केले आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणीही आपले खाजगी वाहन अनधिकृतपणे पार्किंग करून शासकिय वाहनांना अडथळे आणणार नाही असे वाहतूक पोलीस प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. एकंदरीत या शासकीय गोदामाची अनधिकृत अतिक्रमणातून सुटका झाल्याने शासकीय कर्मचारी व नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
जयंत दबडे, गोदाम व्यवस्थापक,
वरिष्ठ रायगड जिल्हा पुरवठा शाखेचे अधिकारी सर्जेराव सोनावणे, खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी, खालापूर पुरवठा शाखा अधिकारी विकास पवार, खोपोली पोलीस निरीक्षक शितल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने येथील अनधिकृत बांधकामांचे अतिक्रमण हटवून अनधिकृतपणे वाहन पार्किंग करणार्या वाहन चालक व मालकांवर दंडात्मक कारवाई देखील केली आहे. शिवाय शासकीय मालमत्तेचे संरक्षण व हगणदारी दुर करण्यासाठी नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी स्वच्छता मोहीम देखील राबविण्यात आली आहे.
शासकीय गोदाम, खोपोली,
तहसिल कार्यालय खालापूर