रायगड जिल्हा सहकारी बँकेचा पगारदार खातेधारकांना दिलासा

रमजानच्या पाश्‍वर्र्भूमीवर बिनव्याजी अ‍ॅडव्हान्स रक्कम
। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे पगारदार खातेदार यांना रमजान ईद या सणाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील 15 हजारपेक्षा अधिक खातेधारकांना बिनव्याजी अ‍ॅडव्हान्स रक्कम उपलब्ध करून देणार आहे.

फेब्रुवारी 2023 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात राज्य मध्यवर्ती संघटनेने बेमुदत कर्मचारी संप पुकारलेला असताना रायगड जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक यांना ऐन मार्च महिन्याच्या लगबगीमध्ये वेतनाचा प्रश्‍न निर्माण झाला होता. तसेच गतवर्षी दिवाळीसणाच्या वेळी देखील वेतन मिळण्यास शासनाकडून तांत्रिक कारणास्तव दिरंगाई निर्माण झाली होती, अशावेळी बँकेने शिक्षक संघटनेच्या मागणीनुसार दोनही वेळेला शिक्षकांना बिनव्याजी अ‍ॅडव्हान्स रक्कम उपलब्ध करून दिली होती. यावेळी देखील महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना, रायगड यांनी बँकेकडे पत्रव्यवहार करून ईदच्या सणाला सदर अ‍ॅडव्हान्स रक्कम बँकेकडून मिळावा ही विनंती केली होती. बँकेचे अध्यक्ष आ. जयंत पाटील आणि संचालक मंडळ यांनी सदर संघटनेची विनंती मान्य करून ही सुविधा तात्काळ कार्यान्वित केली जाणार असल्याचे सांगितले.

जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना बँकेच्या 59 शाखांमध्ये सदर सुविधा 20 एप्रिल 2023 पासून उपलब्ध असेल. याकरिता महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना, रायगड या संघटनेने बँकेचे आभार मानले आहेत. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी याप्रसंगी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की बँकेने जिल्ह्यातील आपल्या पगारदार खातेधारकांसाठी अ‍ॅडव्हान्स वेतन, खातेधारकांचा विमा, मोबाईल अ‍ॅप, शिवाय फोन पे, गुगल पे यांच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करण्याच्या अत्याधुनिक सेवा सुरू केल्याने आणि गरजेला मदत करण्याच्या ग्राहककेंद्रीत धोरणामुळे शिक्षक खातेदार वर्ग मोठ्या प्रमाणावर रायगड जिल्हा सहकारी बँकेशी जोडला गेला आहे. मागील महिन्यामध्ये न्यू इंडिया इन्शुरन्सच्या सहकार्याने देखील जीवनविम्याचे फायदे बँकेच्या वतीने या पगारदार खातेधारक यांना देण्यात आले होते असेही त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

बँकेचे अध्यक्ष आ.जयंत पाटील आणि संचालक मंडळ यांचे निर्णय तसेच शाखेतील कर्मचारी यांनी दिलेली उत्कृष्ट ग्राहकसेवा यामुळे आज बँकेने मार्च 2023 मध्ये 4300 कोटींचा व्यवसाय टप्पा पार केला आहे, यामध्ये ग्राहकांनी आमच्या बँकेवर दाखविलेला विश्‍वास हाच आमचा सर्वोत्तम नफा आहे. बँकेच्या वतीने सामाजिक बांधिलकी आणि सलोख्याच्या भावनेतून अ‍ॅडव्हान्स वेतन सुविधेचा लाभ बिनव्याजी देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्वच शिक्षक खातेधारकांना या योजनेचा लाभ घ्यावा.

मंदार वर्तक, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी

Exit mobile version