साखर कारखान्यांना दिलासा?

कर्जाची होणार पुनर्रचना
मुंबई | प्रतिनिधी |
राज्यातील सहकारी साखर कारखाने गेल्या दोन-तीन वर्षांपासून अडचणीत आले आहेत. अवकाळी पाऊस, दुष्काळ, कोविड काळ यामुळे या कारखाने अडचणीत आले आहेत. काही कारखाने एनपीए झाले आहेत. जेव्हा विक्रमी उत्पादन होतं त्यावेळी जर साखर कारखाने चालले नाहीत तर त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सर्व साखर कारखाने चालले पाहिजेत यासाठी त्यांच्या कर्जाची पुनर्रचना केली पाहिजे यासारखी मागणी होती. त्याला खूपच सकारात्मक पद्धतीने बैठकीत चर्चा झाली, अशी माहिती विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाची केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्यांबाबत भेदभावाचं राजकारण केलं जात आहे. सत्ताधारी पक्षाच्या लोकांचे जे साखर कारखाने आहेत त्यांना परीघाबाहेर जाऊन मदत केली जात आहे तर बाकीच्यांना नियम दाखवले जात आहेत. पण असं न होता सर्वांसाठी समान न्याय व्हायला पाहिजे आणि सर्वांसाठी एकच पॅकेज व्हायला हवं. यासाठी कारखान्यांच्या रिस्ट्रक्चरिंगमार्फत सर्व गोष्टी पुन्हा रुळावर आणता येऊ शकतात. त्यामुळे या मुद्द्यावर बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.

Exit mobile version