‘आरडीसीसी’ बँकेचा बहिणींना दिलासा

बँकेत उघडता येणार ‘झिरो बॅलन्स’ने नवीन खाते

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा व्यवसाय 6000 कोटीपर्यंत पोहोचला आहे. या यशस्वी वाटचालीत जिल्ह्यातील महिलांचा मोठा वाटा आहे. याकरिता बँकेच्या संचालक मंडळाने महाराष्ट्र राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 चा लाभ घेण्यासाठी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नवीन खाते शून्य रुपयात (झिरो बॅलन्सने) उघडण्याची अभिनव योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. रायगड जिल्हा सहकारी बँकेमध्ये महिला बचतगटांच्या माध्यमातून, तसेच ग्रामीण भागातील अनेक महिलांनी अनेक वर्षांपासून खाते उघडले असून, त्यांनादेखील या योजनेचा लाभ मिळवून देण्याकरिता बँकेच्या वतीने जिल्ह्यात कॅम्प आयोजित केले जाणार असल्याचे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी सांगितले.

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी यावेळी बँकेच्या सर्व शाखांना याबाबत परिपत्रकाद्वारे या योजनेचा प्रचार आणि प्रसार करण्याचे आवाहन केलेले असून, जिल्हा बँकेच्या सभागृहात बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत झालेल्या सभेत आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्ह्यामध्ये तब्बल 61 शाखा कार्यरत असून, त्यामध्ये 3 लाखापेक्षा अधिक महिलांची बचतखाती आहेत, त्यामुळे सध्या चालू असलेल्या बचतखात्यामध्येदेखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील रक्कम जमा करून या योजनेचा लाभ महिलांना घेता येणार आहे. बँकेच्या वतीने जिल्ह्यातील अनेक खातेधारकांना प्रधानमंत्री किसान योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, जीवन सुरक्षा योजना याचा लाभ देण्यात येतो आणि विशेषतः जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ग्राहक आमच्यासोबत कायमस्वरूपी जोडला असल्यामुळे रायगड जिल्हा सहकारी बँक ही या सर्व खातेधारकांना आपली जिव्हाळ्याची बँक वाटते, त्यामुळे बँकेने कोणतेही शुल्क न आकारता झिरो बॅलन्सने हे नवीन खाते सुरू करणार असून, त्याचे तात्काळ आधारकार्ड लिंक केले जाणार आहे. त्यामुळे अधिकाधिक महिला ग्राहकांनी बँकेच्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहनही मंदार वर्तक यांनी केले आहे.

Exit mobile version